कर्नाटकचा ‘हा; पोलिस म्हणजे रिअल सिंघम! त्यांचे कार्य पाहून तुम्हीही कराल सलाम

बंगळुरू  – भारतीय चित्रपटांत नायकाला अचाट करणारी कृत्ये करताना दाखवले जाते. जे कोणीच करू शकत नाही, ते हा नायक सहजासहजी करू शकतो. सिंघम हा चित्रपट त्यापैकीच एक. यातील सिंघम नामक नायक त्याच्या ऍक्‍शनमुळे घराघरांत पोहोचला. त्याची लोकप्रियता एवढी वाढली की चांगले काम करणाऱ्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला आता सिंघम ही पदवी बहाल केली जाऊ लागली आहे.

कर्नाटकातील शांथप्पा जीदमनव्वरही त्यापैकीच एक. त्यांच्या डॅशिंग कामामुळे त्यांची चर्चा होत नसून त्यांनी दाखवलेले भान आणि जाणीव यामुळे ते सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत.

करोनामुळे सध्या सगळीकडे ऑनलाइनचे पेव फुटले आहे. शिक्षण सुध्दा त्याला अपवाद नाही. मात्र ज्यांची मोबाइल अथवा ऑनलाइनसाठी साहित्य घेण्याची ऐपतच नाही, अशा मजूरांनी व त्यांच्या मुलांनी काय करायचे? त्यांच्या मुलांनी शिकायचेच नाही का? त्यांनीही पुढे मजुरीच करायची ? असे प्रश्‍न शांथप्पा यांना पडले आणि त्यामुळे ते अस्वस्थ झाले. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या शांथप्पा यांनी त्यांच्यापुरता यातून मार्ग काढण्याचा आणि वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

शांथप्पा आज कामावर जाताना घरातूनच एक फळा घेउन निघतात. बंगळुरूच्या अन्नपूर्णेश्‍वरी नगरातील ज्या मुलांकडे शिकण्यासाठी कोणत्याही साधनसुविधा नाहीत अशा मुलांना ते या फळ्यावर शिकवतात. रस्त्याच्या कडेलाच त्यांची शाळा भरते. विशेष म्हणजे हे सगळे ते त्यांच्या कामकाजाच्या वेळेच्या अगोदरच करतात.

या मुलांना त्यांच्या पालकांप्रमाणे भविष्यात मोलमजुरी करावी लागू नये या उद्देशातूनच आपण हे सगळे करत असल्याचे शांथप्पा यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सोशल मीडियानेही दखल घेतली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Leave a Comment