अन् प्रसंगावधान राखत ‘ती’ बनली चालक; वाचवले चालकाचे प्राण

वाघोली:  वाघोली तालुका हवेली येथील महिलांचा एक ग्रुप मोराची चिंचोली येथे फिरायला गेला होता. यावेळी वाहनचालकाला अचानक फिट आल्याने हनावरील ताबा सुटण्याचा प्रसंग निर्माण झाला होता.  सर्व महिला या प्रकाराने घाबरल्या होत्या. तितक्यात  वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी संबंधित वाहनचालकाला याच वाहनाद्वारे दवाखान्यात पोहोचवण्याचा निर्णय योगिता सातव यांनी  घेतला.

या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघोली येथील योगिता धर्मेंद्र सातव पाटील या महिलेने चार चाकी वाहन स्वतः चालवून वाहन चालकाला वैद्यकीय उपचार मिळणे कामी मोलाची मदत केली व सर्व महिलांना सुखरूप घरी पोहोचवले.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये चार चाकी वाहनाचे चालक बनुन मदत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात खूप प्रसिद्ध झाला. सामाजिक जाणिवेच्या या उदाहरणाद्वारे वाघोलीत महिलांच्या प्रति असणारी संवेदनशीलता दिसून आली. योगिता सातव यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते योगिता सातव यांचा या कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी वर्षा आव्हाळे,स्वाती  तांबे, नंदा  सातव, सुरेखा सातव, कुंदा सातव आदी महिला उपस्थित होत्या.

वाघोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जयश्री राजेंद्र सातव पाटील यांनी योगिता सातव यांच्याकडून वैद्यकीय उपचार मिळवण्या कामी वाहन चालवून केलेल्या मदतीबद्दल त्यांचा सत्कार केला आहे. एका महिलेने केलेल्या मदतीबद्दल दुसऱ्या महिलेने तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली हे सर्वात मोठे प्रोत्साहन आहे.
आशा राजेंद्र वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या