अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याचा पंचायत समिती सदस्याकडून खून; दोघांना अटक

आष्टा – अनैतिक संबधात मुलगा अडथळा ठरत होता म्हणून पंचायत समिती सदस्याकडून ६ ऑक्टोबर रोजी खून करण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे यामध्ये प्रेयसीचाही हात होता. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे हा प्रकार घडला होता. याप्रकरणी आष्टा पोलिसांनी पंचायत समिती सदस्यासह प्रेयसीलाही अटक केली आहे.

अमरसिंह ऊर्फ अमर विश्वासराव पाटील, वय 36 असे पंचायत समिती सदस्याचे नाव असून प्राची सुशांत वाजे,वय 29 प्रेयसीचे नाव आहे. मनन सुशांत वाजे असे खून करण्यात आलेल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचे नाव आहे.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली यामध्ये अमर पाटील शिराळा पंचायत समितीचा सदस्य आहे. तो कोकरूड गणातून निवडून आला आहे. त्याच्या विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाळवा येथील सुशांत वाजे यांचा प्राचीसोबत प्रेमविवाह झाला आहे. त्यांना मनन हा मुलगा झाल्यानंतर प्राची वारंवार घरातून निघून जात असे. तिचे अमर पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सुशांत वाजे यांना होता. ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या दरम्यान प्राची व मनन यांना अमरने मुंबई येथील घरी नेऊन ठेवले होते. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमर व प्राची यांनी ६ ऑक्टोबर रोजी मननचा खून करून कारमधून बिळाशी येथे आणून अंत्यसंस्कार केले व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. मननचा मृत्यू मुंबईत झाला असताना दोघांनी बिळाशीच्या ग्रामसेवकाला हा मृत्यू बिळाशीत झाल्याची खोटी माहिती दिली.

सुशांत वाजे यांनी दोघांविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. बाबर व पथकाने मोबाईलवरील तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबई व परिसरात माहिती घेऊन अमर पाटील यास आंबोलीतून, तर प्राचीला साकीनाका येथील लॉजमधून ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील कार जप्त करण्यात आली आहे.