पुणे जिल्हा | आळंदीत उभारली शिवसृष्टी

आळंदी (वार्ताहर) – शहरातील नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. एक प्रकारची शिवसृष्टीच या ठिकाणी उभारण्यात आली आहे. आळंदीत प्रवेश करताच भाविकांना शिवसृष्टीचे दर्शन होत असून या नुतनीकरणामुळे आळंदीच्या वैभवात भर पडली आहे.

भिंतींचे किल्ल्यासारखे सुशोभीकरण, स्मारकाच्या पायथ्याशी तोफा, मावळे, मशाली, विद्युत रोषणाई, वृक्षारोपण आदी कामे करण्यात आली आहेत. सायंकाळी विद्युतरोषणाईमुळे या परिसरात रम्य वातावरण तयार होत आहे.

या नुतनीकरणासाठी नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समितीमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोउत्थान (जिल्हास्तर) या योजनेतून 10 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन घेऊन हे काम पूर्ण केले आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.