ब्रेक फेल झाल्याने शिवशाहीची सात वाहनांना धडक; पाच जखमी

पिंपरी – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर पाषाण तलाव येथे शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने या बसने सात वाहनांना धडक दिली. यात शिवशाही बससह वाहनांचे मोठे नुकसान झाले असून नऊजण जखमी झाले आहेत.

विलास मानसिंग जाधव (वय 55, रा. उडतरे, ता. वाई, जि. सातारा) असे शिवशाही बस चालकाचे नाव आहे. जाधव हे रविवारी बोरिवली ते सातारा अशी शिवशाही बस (एमएच 04/जेके 3149) घेऊन जात होते. रविवारी दुपारी पाषाण तलाव परिसरात आल्यानंतर बसचे अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे जाधव यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने समोर जात असलेल्या वाहनांवर आदळली.

विशाल तायप्पा निंबाळकर (वय 26, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे), अमित झा (वय 35, रा. हिंजवडी), कमलेश रामेश्वर महापुरे (वय 28, रा. आळंदी), तानाजी नारायण देशमुख (वय 62, रा. कल्याण), कल्पना तानाजी देशमुख (वय 54, रा. कल्याण) अशी जखमींची नावे आहेत. चार वाहनांमधील जखमींबाबत माहिती मिळू शकली नाही. वरील जखमींना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

होंडा डिलक्‍स (एमएच 42/बीडी 8074), पॅशन प्रो (एमएच 12/केएफ 5627), टाटा टियागो (एमएच 14/जेयु 1620), मारुती एर्टिगा (एमएच 05/सीएम 5319), सेलेरिओ (एमएच 12/एसएफ 3087), स्विफ्ट (एमएच 12/केई 4916), वॅगनआर (एमएच 12/केवाय 3283) या वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.