शिवतारेंनी 10 वर्षांत अंगणवाडीही काढली नाही – पुष्कराज जाधव

सासवड येथे युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसची पत्रकार परिषद
सासवड –
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे 10 वर्षे सत्तेमध्ये होते. त्यांनी पुरंदरचा किती विकास केला? सातत्याने ते बारामती-पुरंदरची तुलना करत असता 10 वर्षांमध्ये त्यांना एखादे कॉलेज किंवा अंगणवाडी सुद्धा काढता आली नाही, असा आरोप पुरंदर तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी विजय शिवतरेंवर केला.

सासवड (ता पुरंदर) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुष्कराज जाधव बोलत होते. जिल्हा जिल्हा परिषदेचे स्वीकृत जलसंधारण समितीचे सदस्य योगेश फरतडे, युवक उपाध्यक्ष युवराज जगताप, दिवे-गराडे गटाचे युवक अध्यक्ष सुमित लवांडे, कामगार सेलचे अध्यक्ष विक्रम फाळके, सासवड शहर युवक अध्यक्ष अतुल जगताप, विद्यार्थी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष संदेश पवार, अभिजीत दुर्गाडे, रवींद्र मोरे, संदीप जगताप, श्रीपाद गुरव, शुभम जगताप उपस्थित होते.

योगेश फडतरे म्हणाले की, कोणत्याही मोठा प्रकल्प विजय शिवतारेंनी पुरंदरमध्ये आणला नाही. स्वतःच्या बगलबच्चांना पोसण्यासाठी कामे दिली. स्वतःचा नाकर्तेपण आज झाकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व आमदारांवर टीका करतात. शिवतरे ज्या शाळेमध्ये शिकले त्या रयत शाळेला सव्वा लाख रुपये वगळता एकही रुपया दहा वर्षांमध्ये दिला नाही. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 12 लाख रुपयांची मदत या शाळेला झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या संयोजन शिवाजी कोलते यांनी केले होते.

म्हणजे शेतकऱ्यांचे दु:ख कळेल
विमानतळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, गेली आहेत शेतकरी हे उद्‌ध्वस्त होणार आहेत. या शेतकऱ्यांची कधी शिवतरे यांनी चौकशी केली का? तुम्ही तुमचा बंगला व परिंचे येथील जमीन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना द्या म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळेल शेतकऱ्यांच्या पुनर्वासनाबाबत शिवतरे कधीच बोलत नाहीत. असे कामगार आघाडीचे अध्यक्ष विक्रम फळके यांनी सांगितले.

एकही कारखाना उभा केला नाही

आमच्या नेत्यांवर जर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ स्वतःचा कारखाना नगर जिल्ह्यामध्ये काढला शिवतारेंनी एकही कारखाना पुरंदरमध्ये उभा केला नाही व युवकांना रोजगार दिला नाही. आपण पुरंदरचा कॅलिफोर्निया करणार होते त्याचे काय झाले. याचे देखील उत्तर भविष्यात शिवतरेंना द्यावे लागेल, असे पुष्कराज जाधव यांनी नमूद केले.