पुणे जिल्हा | पुरंदरचे शिवतारे मयूरेश्‍वरचरणी नतमस्तक

मोरगाव, (वार्ताहर)- बारामती लोकसभा मतदारसंघाचे वातावरण निवडणुकीचे रणशिंग फुंकण्या अगोदरच चांगलेच तापले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार या घराणेशाही विरोधात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा प्रतिनिधी म्हणून पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत.

(दि.१४) त्यांनी मोरगाव (ता. बारामती) येथे मयुरेश्वराचे दर्शन घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक लढवण्याचा संकल्प केलेला आहे. बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गावे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी सर्व पद्धतीने मागासलेले आहेत. गेले 50 वर्षे पवार कुटुंबाकडे सत्ता असूनही या भागाला शेती सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांसह येथील ग्रामस्थांची दलनीय अवस्था आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध यापूर्वीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे असा रणसंग्राम होणार आहे. यामध्ये पुरंदरचे माजी आमदार तथा राज्यमंत्री शिवतारे यांनी या रणसंग्रामात उडी घेतली आहे.

पवार कुटुंबीयांकडून मतदारांची दिशाभूल
बारामती लोकसभा मतदारसंघातुन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व जनतेचा प्रतिनिधी म्हणून शिवतारे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने विजय शिवतारे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पवार कुटुंब हे राजकारण करीत मतदारांची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले.

त्यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनानंतर अष्टविनायक तीर्थक्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर अभिषेक पूजा, आरती केली.