धक्कादायक! मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार ; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना प्रकार

चालक, कंत्राटदाराला अटक
मुंबई :
मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेजलाइन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी त्याच्यावर कार चालवणाऱ्या चालकाचे नाव विनोद उधवानी असे आहे. अपघाताचा संपूर्ण व्हिडिओ घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातानंतर कांदिवली पोलिसांनी कार चालक आणि सफाई कंत्राटदाराला अटक केली.

आरोपी चालकाविरुद्ध कलम 279, 196, 336 आणि 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे ड्रेनेज साफसफाई करताना आवश्‍यक सुरक्षा व्यवस्था न केल्याने ठेकेदार अजय शुक्‍ला याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

गेल्या वर्षी 17 लोकांचा मृत्यू
दरम्यान, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या गेल्या वर्षीच्या लोकसभेतील माहितीनुसार 2017 मध्ये 92, 2018 मध्ये 67, 2019 मध्ये 116, 2020 मध्ये 19, 2021 मध्ये 36 आणि 2022 मध्ये 17 सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच, यूपी, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये 40% स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यूपीमध्ये सर्वाधिक 47, दिल्लीत 42 आणि तामिळनाडूमध्ये 43, तर महाराष्ट्रात 30 जणांचा मृत्यू झाला आहे.