पुणे बनले ड्रग्सचे स्लिपर सेल; माफियांना अभय कोणाचे?

पुणे – ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, तब्बल ११०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी मोठ्या कष्टाने हे रॅकेट उद्ध्वस्त केले असले, तरी ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात पोलिसांच्या नाकाखाली मेफेड्रोनची सर्रास विक्री सुरू असल्याने हे पोलिसांचे यश म्हणावे की अपयश, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वास्तविक पाहता ललित पाटील प्रकरणाची व्याप्ती मोठी होती. अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी पोलीस बंदोबस्तातून सहज पळून गेल्याने हे प्रकरण पोलिसांच्याही अंगलट येणार हे स्पष्ट होते. या प्रकरणाचा फायदा घेत विरोधी पक्षांनीही गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. त्यामुळे ललित पाटील प्रकरणाच्या तपासाला गती आली. यात अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी जवळपास डझनभर पोलिसांना निलंबितही करण्यात आले, तर काहींना अटकही झालेली आहे.

हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच राज्यातील सक्रीय झालेल्या पोलिसांनी राज्यात शिरूर, नाशिक भागांत छापेमारी करत शेकडो कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर राज्यात अंमली पदार्थ तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तर पुण्यातही छोट्या- मोठ्या कारवाया सुरू असल्याने, तसेच पोलीस सक्रीय असल्याने ड्रग्स माफियांची मुळे छाटण्यात आली, असे राज्याची पोलीस यंत्रणा सांगत होती.

मात्र, सोमवारी पोलिसांनी गुन्हे शाखेने एक संशयित कार कारवाईसाठी पकडल्यानंतर एका मिठाच्या गोडाउनवर कारवाई करत सुमारे साडेतीन कोटीचे अंमली पदार्थ जप्त केले. मात्र, या प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांना चक्क घबाड हाती लागले आणि कुरकुंभ येथील एका कंपनीत तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६६० किलो मेफेड्रोन ड्रग्स आढळून आले. ही शहराच्या इतिहासातली अंमली पदार्थविरोधी सर्वात मोठी कारवाई असल्याने पुणे पोलिसांचे कौतुक होते आहे.

तरीही या प्रकरणामुळे अनेक प्रश्न सर्वसामान्यांंना पडले आहेत. त्यात ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनची विक्री सुरू असताना पोलिसांना याची खबर कशी नाही, पोलिस ललित पाटील प्रकरणाचा तपास करतानाच ही माहिती समोर का आली नाही. ललित पाटील प्रकरणानंतरही अवघ्या पाच महिन्यांतच हे प्रकार सुरू असतील तर ते कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत?

खरचं ललित पाटील प्रकरणानंतर पोलीस सक्रीय होते, तर मग पुन्हा शहरात मेफेड्रोन विक्री कशी सुरू झाली? की हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे? ड्रग्स माफियांना नेमके अभय कोणाचे? अनेक प्रश्न उपस्थित होत असताना याची उत्तरे कोणाकडेच नाहीत. त्यामुळे आज झालेली कारवाई पोलिसांचे यश आहे की अपयश, असा प्रश्न निर्माण करणारी आहे.