श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षाचा पॅनल उभा करणार – सुप्रिया सुळे

भवानीनगर  (गोकुळ टांकसाळे) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा ऐतिहासिक विजय झाला. त्यांच्या विजयाची सभा इंदापूरणुकीतीच घेण्यात आली. यावेळी त्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष असा पॅनल उभा करण्यात येणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या येऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये रंगत येणार असून खऱ्या अर्थाने जनता कोणाच्या हातात कारखान्याची धुरा देणार आहे हे समजेल. मात्र सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा छत्रपती सहकारी साखर कारखाना असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच हे मोठे आव्हान असणार आहे.

आज पर्यंत माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खासदार सौ सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकीय निर्णय घेत होते. परंतु या पक्षांमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट असे दोन विभागणी झाल्याने सध्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत दीड लाखाच्या फरकाने खासदार सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला.

मात्र इथून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष या पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन येथून पुढील होणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा पूर्णपणे ताकतीने पॅनल तयार करून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे येऊ घातलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष मोठ्या ताकतीने निवडणूक साठी उतरणार असून या पक्षाच्या माध्यमातून छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

आज पर्यंत या छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावून देखील हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात राहिला आहे. मात्र काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय चित्र बदलले असून इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून राजकीय गणिते आखली जाणार असून पूर्ण ताकदीनिशी प्रत्येक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढविले जाणार असल्याने येणारी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी होणार नसून या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनल मध्ये खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार इंदापूर तालुका मध्ये सुरू असतानाच शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष हा पॅनल तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळपासूनच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरणामध्ये बदल झालेला असून येणाऱ्या काळामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही नक्कीच ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे.