पुणे जिल्हा | बेल्हे बाजारतळात शुकशुकाट

बेल्हे, (वार्ताहर) – येथे दर सोमवारी भरणार्‍या बाजार समितीच्या उप बाजार आवारात संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे समजले की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियमन 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 नुसार सुधारणा प्रस्तावित केले आहेत.

त्यानुसार त्यातील सुधारणा या शेतकरी व्यापारी आडते हमाल मापारी व इतर बाजार घटक तसेच बाजार समितीचे अस्तित्व लोक व लोकशाही मूल्यांचे महत्त्व संपुष्टात येणार असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी (दि. 26) राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या.

बाजार समिती यांनी जरी बंद ठेवला असला तरी भाजीपाल्याचा व्यापार करणार्‍या व आपले हातावर पोट असणार्‍या व्यापार्‍यांना बंद ठेवून भागणार नव्हते. त्यांनी आपला व्यापार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार सोडून बेल्हे ग्रामपंचायतच्या कल्याण-अहमदनगर मार्गाच्या कडेने आपला व्यापार सुरू केला;

परंतु काही व्यापारी व्यापारासाठी बेल्हे येथे आले असताना त्यांच्याकडून असे समजले की बाजार समितीचा बंद होता हे माहीत होते; परंतु थोडाफार धंदा होईल या हिशोबाने आम्ही बाजारासाठी आलो. आत्ता येऊन चूक झाली असे आम्हाला वाटते.

कारण आमच्या जाण्या येण्याचा खर्चही सुटणार नाही, असे आता आम्हाला वाटत आहे. भाजीपाला आज इतर सोमवारच्या बाजारापेक्षा स्वस्त असल्याने आजचा भाजीपाला व्यापार्‍यांचा खर्चही सुटणार नाही असे भाजीपाला व्यापार्‍यांच्या बोलण्यातून समजले.

शेतकरी, व्यापार्‍यांचे नुकसान
बाजार समित्या त्यांच्या हक्कासाठी किंवा अस्तित्वासाठी लढत असून, हक्कासाठी त्यांनी आज संपूर्ण राज्यात बाजार समित्या बंद ठेवून सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी त्यांनी संप केला आहे; परंतु ज्यांच्याकडे नाशवंत माल म्हणजे भाजीपाला खरेदी करून ठेवला आहे, त्याचं नुकसान होणार असून काही व्यापार्‍यांचा जाण्याचा खर्चही सुटणार नसून काही व्यापार्‍यांचं आज लाखो रुपयांचे नुकसान होणार असून याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.