nagar | उन्हाचा पारा वाढल्याने रस्त्यांवर सन्नाटा

नगर,(प्रतिनिधी) – उन्हाळा सुरू झाला असून दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने सध्या नगरच्या अनेक रस्त्यांवर भरदुपारच्या वेळी सन्नाटा आढळून येतो. दरम्यान, उष्णतेपासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी टोपी, गॉगल्स, स्कार्प आदींचा आधार घेतला आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्री वाढलेली दिसून येत आहे.

दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे नागरिकांना नकोसे वाटते. परंतु नाईलाज असेल आणि कामावर जाणे गरजेचे असल्याने उद्योगनगरीतील काही भागातील रस्ते दुपारी मोकळे दिसत असले तरी एमआयडीसीतील रस्ते मात्र शिपनुसार नागरिकांनी भरलेले दिसून येत आहेत. परंतु उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल्स, डोक्याला ऊन लागू नये यासाठी टोपी तसेच महिला वर्ग स्कार्प वापरताना दिसून येत आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन बहुतांश हातगाडी, फिरते विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेला या वस्तूंची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत. उन्हाच्या चटक्यापासून बचाव होण्यासाठी बहुतांश नागरिक रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून त्यांच्याकडून टोपी, गॉगल्स आदी वस्तूंची खरेदी करताना दिसून येत आहेत.

परंतु नागरिकांनी गॉगल खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. बहुतांश नागरिक पैशांची बचत होत असल्याने साध्या गॉगलला प्राधान्य देत आहेत. परंतु अशा गॉगलमुळे डोळे जळजळ करणे, दुखणे अशाप्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो चांगल्या दर्जाचे गॉगल किंवा हेल्मेट घ्यावे. जेणेकरून शारीरिक अवयवांना इजा होणार नाही.