पुणे | सिंहगड रस्ता कोंडीमुक्त करणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण वाढत असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातील सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडीसह सर्व समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले.

धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या वतीने या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी या भागातील गणेश मंडळे, तसेच नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह रवींद्र धंगेकर यांनी विठ्ठलवाडी येथील मंदिरात दर्शन घेतले.

माजी आमदार कुमार गोसावी, माजी नगरसेविका अश्विनी कदम, अभय छाजेड, आबा जगताप, चैतन्य पुरंदरे, बापू निंबाळकर, राजाभाऊ कदम, संतोष गोपाळ, अजय खुडे, महेश शिंदे, प्रसाद गिजरे, बाळासाहेब प्रताप, स्वराज गोसावी, रफिक शेख, राजू चव्हाण, लक्ष्मण रायकर, मिलिंद गवंडी, युवराज मदगे, विनोद देसाई, संदीप कडू, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धंगेकर म्हणाले, की सिंहगड रस्त्यावरील पर्वती विधानसभा मतदारसंघात येणारा भाग हा पुणे लोकसभा मतदारसंघात येत असून, गेली अनेक वर्षे येथील नागरिक दररोज होणाऱ्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले आहेत.

उड्डाणपुलामुळे काही प्रमाणात वाहतूककोंडी कमी होणार असली, तरी इतर पर्यायी रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या प्रश्नांवर या भागात विद्यमान लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. खासदार म्हणून निवडून आल्यावर या भागातील प्रलंबित प्रश्नांवर काम करणार आहे. धंगेकर यांचे या भागांतील नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले.