सिनी शेट्टी मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार!

Sini Shetty । 71 वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा ९ मार्च 1924 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे होणार आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी करणार आहे. या स्पर्धेच्या वेळी सध्याची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना बाईलास्का ही नव्या मिस वर्ल्डच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवेल.

28 वर्षानंतर ही स्पर्धा भारतात होत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन जुलिया मोर्ले यांनी जाहीर केले होते, की पुढील स्पर्धा युनायटेड अरब अमिरातीमध्ये होईल. मात्र, नंतर हा निर्णय बदलून ही स्पर्धा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टी ही युवती करणार आहे. ती मुंबईचीच राहणारी असली तरी तिचे मूळ कर्नाटकात आहे. तिच्या विषयीची काही माहिती..

सिनी शेट्टीचा जन्म आणि शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. मात्र तिचे मूळ गाव कर्नाटकात आहे. ती लहानाची मोठी मुंबईत झाली असली तरी कर्नाटकाशी तिचे घट्ट नाते आहे आणि तेथील संस्कृतीने तिच्या जडणघडणीत योगदान दिलेले आहे, असे ती म्हणते. आधुनिकते बरोबरच पारंपारिक मूल्यांचे मिश्रण आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाल्याचे ती सांगते.

लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती आणि ती भरतनाट्यम या नृत्य प्रकारात पारंगत आहे. वयाच्या चौदाव्या वर्षीच तिचा पहिला नृत्याचा जाहीर कार्यक्रम म्हणजेच आरंगेत्रम झाले होते. प्रख्यात नर्तिका राधाकृष्णन पद्मिनी यांच्या मार्गदर्शनाखाली ती भरतनाट्यम शिकलेली आहे.

सिनी मुंबईतील सेंट डोमिनिक सॅव्हियो विद्यालयात शिकलेली आहे. तिने अकाउंटिंग आणि फायनान्स या विषयात पदवी संपादन केलेली आहे. सध्या ती चार्टर्ड फायनान्शियल ऍनालिस्ट या संदर्भातील शिक्षण घेत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या प्रसिद्ध विधाना मुळे सिनीला प्रेरणा मिळालेली आहे. त्यावेळी प्रियांका चोप्रा म्हणाली होती स्त्रीने कोणाच्यातरी दावणीला बांधून घेण्यापेक्षा दावण तोडून कर्तृत्व गाजवावे.

सिनीचा मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेतील प्रवास सुरू झाला, तो तिच्या मिस इंडिया 2022 मधील सहभागापासून. मिस इंडिया स्पर्धेत तिने कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी तिने मिस इंडिया कर्नाटक असा किताब मिळवलेला होता. त्यानंतर ती विविध सौंदर्य स्पर्धा सहभागी होत राहिली.

मिस टॅलेंट, टाइम्स मिस बॉडी अँड ब्युटीफूल या स्पर्धांमध्ये ही तिने 2022 साली यश मिळवले होते. अनेक सौंदर्य स्पर्धा यश मिळाल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली असली, तरी तिचे पाय मात्र अद्यापही जमिनीवर आहेत. त्यामुळेच समाजासाठी काम करण्यातही ती अग्रेसर असते. त्यासाठी ती स्वयंसेवी संस्थांबरोबर ती काम करत असते. आशाएँ या संस्थेच्या ब्युटी विथ पर्पज (बीडब्ल्यूएपी) या प्रोजेक्टमध्ये ती काम करते. ही संस्था लोकांच्या जीवनामध्ये अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी प्रयत्नरत आहे.

आता 71 वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा तोंडावर येऊन ठेपलेली असताना सिनीने स्पर्धेची तयारी करण्यात वर लक्ष केंद्रित केलेले आहे. पारंपरिक मूल्ये, उच्च शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक भान यातून भारतीय स्त्रीचे आधुनिक रूप दाखवून आपण या स्पर्धेत यशस्वी होऊ असा विश्वास तिने व्यक्त केलेला आहे.