नागपूर हादरलं! अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणून बहिणीने 12 वर्षीय भावाची केली हत्या

नागपूर- नागपुरामध्ये एका 12 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाची हत्या बहिणीच्या अनैतिक संबंधांची कोणाला माहिती होऊ नये म्हणून तिनेच ही ह्त्या केल्याचा पोलीसांना संशय बळावला आहे. नागपुरजवळील द्रुगधामना येथे ही घटना घ़डली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुजल नाशिक रामटेके असे ह्त्या करण्यात आलेल्या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. वाडी पोलीसांनी मुलाच्या 17 वर्षीय बहिणीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मृत सुजलचे वडील माथाडी कामगार आहेत, तर आई खाजगी नोकरी करते. सोमवारी सुजलचे आई वडील दोघंही कामावर गेले होते. दरम्यान घरी सुजल आणि त्याची सतरा वर्षीय बहीण होती. दुपारी सुजल दुकानात जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. पण दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असे ओरडत घरी आला, त्यानंतर सुजलच्या बहिणीने त्याला पाणी प्यायला दिले. त्यानंतर सुजल निपचित पडला, अशी माहिती सुजलच्या बहिणीने शेजाऱ्यांना दिली.

यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना देखील बहिणीनं अशीच माहिती दिली. पण मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमात अनेक विसंगती आढळून आल्या. तसेच मुलाची गळा आवळून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. तसेच घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीनेच भावाची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला.

घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे अनैतिक संबंधांचा बोभाटा होऊ नये म्हणूनच निरागस सुजलची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.