‘…तर कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना तब्बल ९ महिन्यांनंतर लस घेता येणार’?

नवी दिल्ली  – करोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे.  करोना संकटावर मात करण्यासाठी लसी उपलब्ध  झाल्या आहेत. मात्र, लसीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्‍न घोंघावत आहेत. त्यातून जनतेला पडलेले प्रश्‍न आणि त्यांच्या उत्तरांची यादी आरोग्य मंत्रालयाने जारी केली होती.  

यात कोरोनातून बरे झाल्यानंतर लक्षणं पूर्णपणे जाईपर्यंत थांबा आणि त्यानंतर ६ महिनेनंतर लस घ्या. असे आरोग्य  मंत्रालयानं सांगितले होते. मात्र आता  नेशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वैक्सीन एडमिनिस्ट्रेशनद्वारे  (NEGVAC) या सूचनेत बदल करण्याची शक्यता  वर्तवली जात आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी अशी शिफारस या गटानं केली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना ६ महिन्यांनंतर लस देण्याचा निर्णय नुकताच घेतला गेला होता. आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे. 

याबाबत  NEGVAC कडून  माहिती देण्यात आली आहे की, एखाद्या व्यक्तीनं कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील सहा महिने त्याचं कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ९ महिन्यांनंतर लसीचा डोस देण्याचा निर्णय लवकरच होऊ शकतो.   

दरम्यान,  कोरोनावर मात केलेल्यांना सध्या लसीसाठी ६ महिने वाट पाहावी लागत आहे. मात्र आता हा कालावधी ९ महिन्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.