‘दिल्लीश्वरांच्या साथीने काही लोकं महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम चालवताहेत’

मुंबई –  मुंबईत सापडलेली स्फोटके, सचिन वाझे, परमवीर सिंग यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकार विरोधकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप  केले आहे.  भाजप नेते  यासंदर्भात राजभवनात पोहोचले आहेत. तर विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती अद्यापही प्रलंबित आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे विरोधकांवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले कि, राज्यातील विरोधक महाराष्ट्राचे भूमीपुत्र म्हणून दिल्लीपुढं राज्याच्या हितासाठी सरकारसोबत ठामपणे उभे राहिले असते तर इथल्या सर्वसामान्य मराठी माणसाला त्यांचा अभिमानच वाटला असता! मात्र सत्तेच्या हव्यासापोटी मराठी अस्मितेची विरोधकांकडून केली जाणारी हेळसांड आज मराठी माणूस बघत आहे. आज विरोधीपक्षातील ही काही लोकांना त्यांचे नेते घेत असलेली भूमिका ही न पटणारी आहे मात्र ते गप्प आहेत. सामान्य मराठी माणसाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही हा इतिहास आहे. मराठी माणूस हे सर्व पाहत आहे. तो आज दिसत शांत असला तरी योग्य वेळेस तो प्रतिक्रिया देईल… मात्र तशी वेळ विरोधकांनी मराठी माणसांवर येऊ देऊ नये अशी मी विनंती करतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्र… ज्या नावातच एक महान राष्ट्र दडलेलं आहे असं हे आपलं राज्य. सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती झालेलं….

Posted by Rohit Rajendra Pawar on Thursday, March 25, 2021

 

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

महाराष्ट्र… ज्या नावातच एक महान राष्ट्र दडलेलं आहे असं हे आपलं राज्य. सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती झालेलं. महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहासच अनेक ज्ञात अज्ञातांच्या शौर्याची गाथा आहे. अनेकांनी महाराष्ट्रासाठी आपली आहुती देऊन ही भूमी पवित्र केलीय. परकीय सत्ता भारतात लोकांवर अन्याय-अत्याचार करत होती तेंव्हा याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. हे करत असताना महाराजांना परकीयांबरोबरच अनेक स्वकीयांनीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वराज्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ते लढले आणि जिंकले.

परकीय आक्रमणांना मावळ्यांच्या साथीने समर्थपणे तोंड दिलं. स्वराज्याचा घास गिळायला दिल्लीहून चाल करून आलेल्या शाहिस्तेखानाला मात्र तुटलेली बोटे घेऊन जावं लागलं. पुढं मिर्झा राजे जयसिंग स्वराज्य संपवण्याचा चंग बांधून आले. महाराजांना नाईलाज म्हणून त्यांच्याशी तह करावा लागला. स्वराज्याचे किल्ले मुघलांना द्यावे लागले. मात्र ज्या वेगाने आपण मुघलांना तहात किल्ले दिले त्याच वेगाने महाराजांनी ते परतसुद्धा घेतले. दिल्लीश्वर औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण करायला आला आणि मराठ्यांनी त्याला कित्येक वर्षे झुंजवले आणि शेवटी याच भूमीत त्याची माती झाली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे….

महाराष्ट्र हे अनेक अर्थाने देशातील आघाडीचं राज्य राहिलंय. मग त्यात महाराष्ट्राने साधलेली आर्थिक प्रगती तर आहेच पण आपल्या राज्यातील शैक्षणिक प्रगती, राज्यात रुजलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक सलोखा आणि पुरोगामित्व या गोष्टी महाराष्ट्राला आणखी झळाळी देतात. महाराष्ट्राचा वारसा हा संघर्षाचा, क्रांतीचा, त्यागाचा राहिलाय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी अनेकांनी संघर्ष तर केलाच मात्र १०६ जणांनी स्वतःचं बलिदान दिलं तेंव्हा संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं.

आज राहण्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल किंवा व्यावसायिक गुंतवणुकीसाठी असेल देशातील आणि जगातील लोकांची पसंती ही महाराष्ट्रालाच आहे. महाराष्ट्र हे देशातील कदाचित एकमेव राज्य असेल जिथं बाहेरून येऊन महाराष्ट्रात स्थाईक झालेले लोक सुद्धा स्वतःला अभिमानाने मराठी म्हणतात इतका आपलेपणा या राज्यातील लोकांनी जपलाय.

ही सर्व प्रगती महाराष्ट्र साधू शकला, यामध्ये जितका येथील राज्यकर्त्यांचा वाटा आहे तेवढाच किंबहुना त्याहून जास्तीचा वाटा इथला सामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि जनतेचा राहिलाय.

महाराष्ट्र घडवण्यात सामान्य शेतकरी, इथला उद्योजक, इथले साहित्यिक, रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा कामगार वर्ग, शिक्षक, नवनवीन तंत्रज्ञान रुजवणारे शास्त्रज्ञ यांचा वाटा मोठा आहे. गेल्या ६० वर्षात मराठी माणसाने अत्यंत जिद्दीने या राज्याला अव्वल स्थानी नेऊन ठेवलंय. इथल्या लोकांना जितका स्वाभिमान देशाचा आहे, तितकाच ज्वाजल्य अभिमान मराठी माणसाला मराठी परंपरा आणि संस्कृतीच्या बाबतीतही आहे. मराठी माणसाने किंबहुना महाराष्ट्राने विविधतेने नटलेल्या आपल्या देशात स्वतःची व आपल्या राज्याची मराठी अस्मिता स्वाभिमानाने तेवत ठेवलीय. जेंव्हा-जेंव्हा हिमालयावर संकट आलं त्या प्रत्येक वेळी सह्याद्री मदतीला धावून गेला असल्याचा इतिहास साक्षीदार आहे. महाराष्ट्राला जसे संतांनी घडवले तसेच टिळक, फुले, शाहू, आंबेडकर, अहिल्यादेवी, अण्णाभाऊ साठेंसारख्या समाजसुधारकांनीही घडवलंय.

राज्याचा पाया भक्कम व्हावा म्हणून अहोरात्र झटणारे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब आपण पाहिले आहेत. राज्यात सहकार चळवळ रुजवणारे स्व. वसंतदादा व स्व. विठ्ठलराव विखे-पाटील आपण पाहिले आहेत.

अन्न धान्याच्या बाबतीत जर मी महाराष्ट्राला परिपूर्ण नाही करू शकलो तर मला जगण्याचा अधिकार नाही असं म्हणणारे स्व. वसंतराव नाईक साहेब या महाराष्ट्राने पाहिले आहेत. कृषी तसंच उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्राला पुढे नेणारे पवार साहेब आपण पाहिले आहेत. प्रशासनाला शिस्त लावणारे स्व. शंकरराव चव्हाण साहेब पाहिले आहेत. राज्याचा विकासाचा आलेख उंचावणारे स्व. विलासराव देशमुख साहेब आपण पाहिले आहेत .

हे सर्व संगण्याचा हेतू एवढाच आहे की या राज्यातल्या प्रत्येक भागातून ज्या ज्या लोकांनी या राज्याचं नेतृत्व केलं मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो! तत्कालीन सर्व नेत्यांनी प्रादेशिक अस्मिता, हेवे-दावे बाजूला ठेवून हे राज्य कसं पुढं जाईल हीच भूमिका नेहमी घेतल्याचं दिसून येतं. जेंव्हा देशासाठी त्याग करण्याची वेळ येते तेंव्हाही महाराष्ट्र सर्वात पुढे असतो. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर टाकणारा हा महाराष्ट्र आहे. मात्र जेव्हा प्रश्न राज्याचा येतो इथल्या मराठी माणसाचा येतो तेंव्हा महाराष्ट्र एकसंघ होऊन संघर्षाला सामोरा जातो हा इथला इतिहास आहे. मग तो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असो, की राज्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा एखाद्या राज्यात मराठी माणसावर होणारा अन्याय असो. गरज पडेल तिथं परखड भूमिका महाराष्ट्राने नेहमीच घेतलीय. संकटाच्या काळात दिलदारपणे साथ देणारा मात्र राज्यावर जेंव्हा संकटं येतात तेंव्हा एकदिलाने इथला माणूस उभा राहिलाय. महाराष्ट्राचा इतिहास व वर्तमान संघर्षातून उभा राहण्याचा राहिला आहे.

आज आपल्यातीलच काही लोकं दिल्लीश्वरांच्या साथीने महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम गेल्या वर्षभरापासून सातत्याने चालवली आहेत. या मोहिमेच्या विरोधात विवेक असलेला प्रत्येक माणूस उभा असल्यानेच त्यांचे बदनामीचे सगळी कारस्थानं अपयशी होत आहेत. आज केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून अनेक राज्यांमध्ये स्वतःची सत्ता आणण्यासाठी भाजपने काय काय केलं याचं उदाहरण आपण गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यांमध्ये पाहिलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करतांनाही राज्यपालांच्या माध्यमातून, राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून सातत्याने अडवणूक करण्याचे सर्व प्रयत्न विरोधकांकडून करून झाले. तरीही सरकार पडत नाही म्हटल्यावर सुशांतसिंह राजपूत प्रकरण, कंगना राणावत प्रकरण समाजमध्यामांवर लावून धरून राज्य कोरोनाच्या अडचणीतून जात असतानाही राज्यसरकारला बदनाम करण्याची कोणतीही संधी विरोधकांनी सोडली नाही.

इथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, गोपीनाथ मुंडे साहेबांचा! ही मंडळी विरोधासाठी विरोध करणारी नव्हती. जेंव्हा एखादा प्रश्न देशाच्या किंवा राज्याच्या अनुषंगाने महत्वाचा असायचा तेव्हा या सर्वांची भूमिका ही तत्कालीन सरकारबरोबर बसून संवादाच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्याची असायची. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवार साहेबांबरोबर बसून चर्चा केल्याचे आपण जाणतोच. मात्र आज त्याच पक्षातील लोक या जेष्ठ नेत्यांची कामाची पद्धत दुर्दैवाने स्वीकारताना दिसत नाहीत. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे राज्याचे अनेक प्रश्न सभागृहात चर्चिले गेले नाहीत व त्यावर तोडगा ही निघाला नाही.

राज्यपाल हे खरंतर राज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून केंद्र व राज्यात सुसूत्रता राहावी यासाठी काम करणारे पद असतानाही सध्याचे राज्यपाल महोदय यांचा जास्तीचा कल हा केंद्राकडं दिसून येतो. आज खरंतर आदरणीय राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचं कोणतंच कारण नाही. मात्र राज्यपाल महोदय कशासाठी आणि कोणाची वाट पाहत आहेत हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो.

सध्याचे विरोधक सत्तेत असताना दिल्लीला खुष करण्यात इतके मश्गुल झाले होते की राज्याला न मिळणारे हक्काचे पैसे, राज्यातील आरक्षणाचा मुद्दा, राज्याला आर्थिक दृष्टया अडचणीत आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प, राज्याचे हक्काचे IFSC सेंटर आणि नागपूर ची खनिकरण संस्था यासारखे प्रकल्प गुजरातला हलवताना कशाचंच भान त्यांना राहिलं नाही आणि आजही त्यांची तीच परिस्थिती आहे. सध्या राजकीय कुरघोड्यांच्या प्रयत्नात बऱ्याच चांगल्या अधिकाऱ्यांची, मराठी अधिकाऱ्यांची नावे घेतली जात आहेत, ही नाहक बदनामी आहे. ज्या गोपनीय अहवालाचा हवाला देऊन आरोप केले गेले, त्या गोपनीय अहवालाचं सत्यही जनतेसमोर आलं आहे. अहवाल गोपनीय असतील तर मग हे अहवाल बाहेर पुरवणारे अधिकारी कोण? त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांचे कोणाशी संबंध आहेत? याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.

आज खरंतर हेच विरोधक या भूमीचे पुत्र म्हणून सरकारसोबत ताठ कण्याने दिल्लीपुढं महाराष्ट्राच्या हक्कासाठी उभे राहिले असते तर इथल्या सामान्य मराठी माणसाला त्यांचा अभिमानच वाटला असता याची मला खात्री आहे. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी मराठी अस्मितेची विरोधकांकडून केली जाणारी हेळसांड आज मराठी माणूस बघत आहे. आज विरोधीपक्षातील ही काही लोकांना त्यांचे नेते घेत असलेली भूमिका ही न पटणारी आहे मात्र ते गप्प आहेत. सामान्य मराठी माणसाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही हा इतिहास आहे. मराठी माणूस हे सर्व पाहत आहे. तो आज दिसत शांत असला तरी योग्य वेळेस तो प्रतिक्रिया देईल… मात्र तशी वेळ विरोधकांनी मराठी माणसांवर येऊ देऊ नये अशी मी विनंती करतो, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment