आईच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बारामती –  वादविवादातून कुदळ व कुऱ्हाडीने आईची हत्या केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांनी मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदिप वेताळ मिसाळ (वय ३५ वर्षे, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापुर, जि. पुणे ) याने त्याची आई कलावतीची हत्या केली होती.

या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर घटना (दि. २४ जुलै २०१४) रोजी ( भोंग वस्ती, काटी ता. इंदापूर ) येथे मयत कलावती मिसाळ यांचे रहाते घरी घडली. आरोपी काहीही कामधंदा करत नव्हता. त्यावरुन आरोपी संदिप मयत कलावती व फिर्यादी प्रदिप मिसाळ यांचेमध्ये वादविवाद होत असत.

घटनेदिवशी फिर्यादी प्रदिप मिसाळ हा सकाळी इंदापूर येथे महाविदयालयात गेला. त्यावेळेस कलावती व आरोपी संदीप दोघेच घरी होते. प्रदीप दूपारी दीडच्या दरम्यान घरी आला तेव्हा आरोपी संदीप हा त्यांचे घराचे बाहेर खुर्चीवर बसला होता व त्याचे कपडयास रक्ताचे डाग होते. आईला कुणीतरी मारले आहे, असे सांगितले. त्यानंतर प्रदीपने नातेवाईक व शेजारी यांना बोलावून घेतले व घरी कुणी आले होते काय याची खातरजमा केली. त्यावर घरी कोणीही आले नसल्याचे लक्षात आले. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी संदीप विरुद्ध भा.द.वि. कलम ३०२ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

सदर प्रकरणाचा तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी.व्ही. काळे यांनी केला. तपासामध्ये आरोपीने त्याची आई कलावती हीचे कुदळ व कु-हाडीने डोक्यात, तोंडावर, कपाळावर वार करुन हत्या केल्याचे व घरात सांडलेले रक्त व कु-हाडीचे व कुदळीचे रक्त पुसून पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल झाले होते. सदरचे प्रकरण बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांचेसमोर चालले.

सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी कामकाज पाहून ८ साक्षीदार तपासले. तसेच खटल्यामध्ये डॉ. नामदेव गार्डे यांचा न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला. तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. खटला परिस्थीतीजन्य पुरावा व वैदयकीय पुरावा यांवर आधारीत होता.

सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी संदीप वेताळ मिसाळ यांस भां.द.वि. कलम ३०२ प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भा.द.वि. कलम २०१ मध्ये पुरावा नष्ट केला म्हणून ३ वर्षे सक्त मजूरी व दंड न भरल्यास १ वर्षे सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.

सदर खटल्यामध्ये सरकारी वकील प्रसन्न जोशी यांना इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार पोलीस नाईक मयुर गायकवाड व न्यायालयीन कोर्ट पैरवी ए.एस.आय. एन.ए. नलवडे यांनी सहकार्य केले.