बारटक्के दवाखान्यात लवकरच ‘सिटी स्कॅन’ची सुविधा

पुणे – प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी मधील कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात लवकरच सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी दिली. दरम्यान, या दवाखान्यात डायलेसिसची सुविधा सुरू करण्यास नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिल्याने, भविष्यात या भागातील सर्वसामान्यांसाठी हे रूग्णालय वरदान ठरणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

धुमाळ म्हणाल्या की, या दवाखान्यात डायलेसीस सेंटर, एक्‍सरे व सोनोग्राफी ची सुविधा लवकरच सुरू करीत आहोत. यामध्ये दहा डायलेसीस बेड्‌स ची व्यवस्था करीत आहोत. या सुविधे मुळे वारजे; कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवा कोपरे -धावडे तसेच कोथरूड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय नियमानुसार अतिशय कमी शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक्‍सरे व सोनोग्राफी ची सुध्दा व्यवस्था करीत आहोत.

या डायलेसीस सेंटर चे लोकार्पण सोहळा लवकरच करीत आहोत की जेणे करून नागरिकांना पुणे शहरात लांबच्या ठिकाणी अथवा खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन जावे लागणार नाही. या उपक्रमा मुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना या केंद्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर याच दवाखान्यात महानगर पालिकेच्या माध्यमातून सिटी स्कॅन मशिन ची व्यवस्था नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.