जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शहरे ; ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन

टोकियो : जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन आता जपानमध्ये विशेष शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठाची शारीरिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन ही नवी कॉम्पॅक्ट शहरे उभारण्यात येणार आहेत. जपानमध्ये आज साडे तीन कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.

या योजनेतील पहिले शहर राजधानी टोकियोपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर तोयामा येथे उभारण्यात येणार आहे. या शहरात सध्या उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करून त्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत. वाहतूक व्यवस्था हॉटेल्स रेल्वे स्टेशन्स आणि विमानतळ या सर्व ठिकाणी जेष्ठ नागरिकांच्या सोयीचे असे बदल केले जाणार आहेत.

दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये तोयामा शहर 90% नष्ट झाले होते. त्यामुळे त्यानंतर त्याची विशेष उभारणी करण्यात आली होती याच शहरांमध्ये आता थोडेफार बदल करून ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे अशा प्रकारे हे शहर तयार करण्यात येणार आहे. जपानच्या इतर शहरांच्या तुलनेत या शहरांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे या शहरातील उत्पन्नही कमी आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच जेष्ठ नागरिकांना सोयी सुविधा मिळतील अशा प्रकारे या शहराचे नियोजन केले जात आहे. शहरामध्ये लाईट रेल्वेचा प्रयोग प्रथमच करण्यात येणार असून फलाटावरून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या डब्यात प्रवेश करणे सोपे जावे अशा प्रकारे या रेल्वेची रचना करण्यात येणार आहे. या शहरातील हा प्रयोग यशस्वी झाला की जपान मधील इतर काही शहरांमध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्येष्ठांसाठी विशेष शहरे उभारली जाणार आहेत.