#WIvSL 2nd T20 : श्रीलंकेची वेस्ट इंडिजवर 43 धावांनी मात

अँटिगा – श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 6 बाद 160 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा डाव 18.4 षटकात 117 धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर गुणतिलका आणि पाथुमा नासिंकाने पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरविला.

गुणतिलकाने आक्रमक खेळी करत 42 चेंडूत 56 धावा ठोकल्या. नासिंकाने त्याला चांगली साथ देता 37 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये हसरंगा डीसिल्वाने नाबाद 19 धावांची खेळी केल्याने श्रीलंकेने 6 बाद 160 धावांपर्यंत मजल मारली. 160 धावांचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात निराशाजनक ठरली.

श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. सलामीवीर लेंडल सिमन्सने सर्वाधिक 21 धावा केल्या. तर अन्य 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. हसरंगाने 17 धावांत घेतलेल्या 3 विकेट आणि नाबाद 19 धावांची खेळी केल्याने त्याला सामनावीर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Leave a Comment