satara | एसटी बसची बंद ट्रकला धडक

खंडाळा, (प्रतिनिधी) – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा येथे काल (दि. 1) रात्री बंद पडलेल्या ट्रकला एसटी बसने दिलेल्या धडकेत बसमधील एक जण गंभीर, तर चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पारगाव-खंडाळा हद्दीत ट्रक (एमएच-46-बीयू-7822) शनिवारी (दि. 1) रात्री बंद पडला होता. महामार्गावरून निघालेल्या भरधाव एसटी बसने (एमएच-14-केक्यू-9751) 1.45 च्या सुमारास ट्रकला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यात बसमधील एक प्रवासी गंभीर, तर चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवून दिले. संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बसचालक श्रीधर जाधव (रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार बाबुराव वरे तपास करत आहेत.