शिवशाही बससेवा सुरू करायची, की नाही?

प्रवाशांनी पाठ फिरवल्याने उत्पन्न घटण्याची धास्ती : एसटी अधिकारी पेचात

पुणे – शिवशाही बसेसच्या वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. नव्या शिवशाही बस ताफ्यात दाखल होत आहेत. खासगी बसच्या तुलनेत शिवशाहीचे तिकीट जास्त असल्यानेही या बसेसना अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यातच आगारांचे उत्पन्न घटल्यास थेट शिक्षा देण्याचे लेखी आदेश महामंडळाने नुकतेच दिल्याने आगारात शिवशाही सुरू करायची का नाही? असा पेच एसटी अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या आगारांना शिक्षा करण्याचे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे सध्या चांगले प्रवासी भारमान आणणाऱ्या साध्या बसेस, हिरकणीच्या जागी शिवशाही सुरू केल्यास प्रवासी भारमान कमी होण्याची शक्‍यता आहे. याचा थेट परिणाम आगारांच्या उत्पन्नावर होण्याची शक्‍यता आहे.

सध्या महामंडळाच्या ताफ्यात एकूण 1,135 शिवशाही आहेत. यात स्वमालकीच्या 724 (आसनी) आणि भाडेतत्त्वावरील 411 यांचा समावेश आहे. राज्यातील 186 मार्गांवर रोज आसनी बसेसच्या 1,720 आणि शयनयान बसेसच्या 66 फेऱ्या होत आहेत.

प्रादेशिक आगारात नोंदणी सुरू
राज्यातील निवडक मार्ग वगळता अन्य मार्गांवरील शिवशाही अद्याप प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे येथील रामवाडी परिसरातील प्रादेशिक आगारात महामंडळाच्या 15 शिवशाही बसेसची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर लवकरच या बस सुरू करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment