nagar | चोरी करणाऱ्या महिला पोलिसांच्या जाळ्यात

राहुरी, (प्रतिनिधी) – राहुरी पोलीस ठाणे हद्दीत बसमध्ये प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन महिलांना राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले.

दि. २ मार्च रोजी एक महिला तिच्या आईला सोडण्यासाठी कोल्हारवरून बीडकडे बसने जात असताना बसमध्ये अनोळखी तीन महिलांनी फिर्यादी महिलेस धक्काबुक्की केली. तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र व रोख रक्कम चोरी केली. महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातआला होता.

तेव्हापासून राहुरी पोलीस पथक आरोपींचा शोध घेत होते. तपासादरम्यान सापळा लावून आरोपी पूजा आकाश रोकडे व संगीता जीवन लोंढे (दोघी रा.श्रीरामपूर) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त करण्यात आली. महिला आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक धर्मराज पाटील हे करीत आहेत.