Stock Market: विक्रीच्या माऱ्यामुळे शेअर निर्देशांकांत घट; विप्रो, रिलायन्स, एअरटेल पिछाडीवर

मुंबई – शेअर बाजार बंद झाल्यानंतर औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीची माहिती जाहीर होणार होती. त्याचबरोबर जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे सकाळपासून भारतीय शेअर बाजारात बरीच विक्री होऊन निर्देशांक कमी झाले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 388 अंकांनी कमी होऊन 58,576 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकांनी म्हणजे 0.82 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 17,530 अंकांवर बंद झाला.

विप्रो, रिलायन्स, भारती एअरटेल या कंपन्याबरोबर टाटा स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. मात्र अशा परिस्थितीतही ऍक्‍सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, पावर ग्रीड, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ नोंदली गेली.

अमेरिकेच्या कर्ज रोख्यावरील परतावा वाढून 2.8 टक्‍क्‍यावर गेल्यामुळे जागतिक गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 1,145 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.

अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचा शेअरबाजार असलेल्या नॅसडॅक शेअर बाजाराचा निर्देशांक कमी झाल्यामुळे भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट नोंदली गेली. टीसीएस कंपनीने काल चांगला नफा असलेला ताळेबंद जाहीर करूनही आज या कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली नाही.