Stock Market : महागाईमुळे शेअर निर्देशांकांत घट

मुंबई – अमेरिकेने व्याजदरात प्रचंड वाढ करूनही ऑगस्टमध्ये अमेरिकेतील महागाई 8.3 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात आक्रमक वाढ करण्याची शक्‍यता असल्यामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारामध्ये बुधवारी विक्री होऊन निर्देशांक कोसळले. भारतीय शेअर बाजारातही निर्देशांक सकाळी मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र नंतर काही प्रमाणात खरेदी होऊन ही झीज कमी झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 224 अंकांनी कमी होऊन 60,346 अंकावर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक तब्बल 1,200 अंकांनी कोसळला होता. मात्र नंतर झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्‍स 60,000 अंकाच्या वर राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66 अंकांनी कमी होऊन 18,003 अंकावर बंद झाला.

अमेरिकेतील व्याजदरवाढीमुळे महागाई वेगात कमी होईल असे जागतिक गुंतवणूकदारांना वाटत होते. मात्र महागाई कमी होण्याचा वेग मंदावला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी मंदी आली तरी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच महागाईची आकडेवारी जास्त पातळीवर असल्यामुळे आता व्याजदर वाढ होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.

आज झालेल्या विक्रीचा फटका इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल अँड टी, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज या बड्या कंपन्यांना बसला. मात्र इंडसइंड बॅंक, पावर ग्रीड, एनटीपीसी, स्टेट बॅंक, कोटक बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठे हानी टळली.

भारतातील घाऊक महागाई कमी होऊन 12.41% इतकी झाली असली तरी ती 17 महिन्यापासून दहा टक्‍क्‍याच्या वर आहे. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 1,956 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी जागतिक परिस्थितीचा शेअर बाजार निर्देशांकावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.