Share Market 6 June : सेन्सेक्सने पुन्हा 75 हजारांचा टप्पा ओलांडला; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात 8 लाख कोटी रुपयांची वाढ

Share Market 6 June 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे झालेल्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरताना दिसत आहे. आज, 6 जून सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्सने 75,000 चा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बाजारात आज चौफेर तेजी होती.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 2.28 टक्के आणि 3.06 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशीही हिरव्या रंगात बंद झाले. रिअल्टी, भांडवली वस्तू, उद्योग, आयटी आणि पॉवर समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 692.27 अंकांनी किंवा 0.93% ने वाढून 75,074.51 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 201.05 अंकांच्या किंवा 0.89% च्या वाढीसह 22,821.40 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले 8.26 लाख कोटी –

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 6 जून रोजी वाढून 416.32 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार, 5 जून रोजी 408.06 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 8.26 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 12.96 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग वाढीसह बंद झाले. त्यातही टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.07 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर, एचसीएल टेक 4.04 टक्के, एसबीआय 3.46 टक्के, इन्फोसि्स 2.95 टक्के, आणि एनटीपीसी लिं.चे शेअर्स 2.65 टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –

तर सेन्सेक्सचे केवळ 7 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) चे समभाग 2.04 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. याशिवाय एशियन पेंट्स 1.88 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) 1.57 टक्के, नेस्ले इंडिया 1.36 टक्के आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स 1.25 टक्के घसरून लाल रंगात बंद झाले.

खाली दिलेल्या चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-


3,010 समभागांमध्ये वाढ झाली –

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज एकूण 3,945 समभागांची खरेदी-विक्री झाली. यापैकी 3,010 शेअर्स वाढीसह बंद झाले. 833 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 102 समभाग कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 131 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 40 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.