Share Market 5 June: सेन्सेक्सचे जोरदार पुनरागमन, निर्देशांकाने घेतली 2300 अंकांची उसळी; गुंतवणूकदारांनी कमावले 13 लाख कोटी रुपये

Share Market 5 June: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेल्या धक्क्यातून सावरत शेअर बाजाराने बुधवार, ५ जून रोजी जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्समध्ये 2300 अंकांची बंपर वाढ झाली. निफ्टीनेही 3 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 22,600 च्या वर पोहोचला. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात सुमारे 13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात चौफेर तेजीचे वातावरण होते. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 4.41 टक्के आणि 2.93 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात बंद झाले.

व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 2,303.20 अंकांनी किंवा 3.20% ने वाढून 72,079.05 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 735.85 अंक किंवा 3.36% च्या उसळीसह 22,620.35 वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी 12.96 लाख कोटी रुपये कमावले –

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 5 जून रोजी वाढून 407.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 4 जून रोजी 394.83 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 12.96 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 12.96 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –

शेअर बाजारातील आजची वाढ इतकी जोरदार होती की सेन्सेक्समधील 30 पैकी सर्व 30 समभाग वाढीसह बंद झाले. त्यातही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 7.75 टक्क्यांनी वाढ झाली. यानंतर, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 4.89% ते 6.55% वाढीसह बंद झाले.

खालील चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-

2,599 समभागांमध्ये वाढ झाली –

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज एकूण 3,918 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,599 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,221 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 98 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 117 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 110 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.