पुणे जिल्हा : माळशेज घाटात एसटी थांबवत चालकाची दरीत उडी

जुन्नर – माळशेज घाटातील बोगद्याजवळ महादेव मंदिरासमोर एसटी थांबवत एसटी चालकाने दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

गणपत मारुती इंदे (वय 48, रा. भंडारदरा, ता. अकोले, अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. इंदे हे अकोले-कल्याण बस घेऊन जात होते. अहमदनगर डेपोची ही बस होती. यावेळी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक परिश्रमाने 200 फुट दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला.

यावेळी टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी संतोष दराडे आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम जुन्नरचे प्रशांत कबाडी, माजी सैनिक रमेश खरमाळे, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, श्‍याम कबाडी, लखन डाडर, संकेत बोंबले, सुनील शिंदे, स्थानिक ग्रामस्थ साबळे मामा, बाळू साबळे, कॉन्स्टेबल पांडुरंग बगाड, सुनील साबळे आदींनी मृतदेह काढण्यास मदत केली.