आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणाव; कोल्हापुरात बंदची हाक

कोल्हापूर – एका वादग्रस्त पोस्टमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. काही परिसरातील लोकांनी स्टेटसवर औरंगजेबाचे स्टेटस लावले होते. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. ही माहिती समजल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी घोषणाबाजी करत आक्षेपार्ह स्टेटस लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले होते.

मात्र काही वेळानंतर काल सायंकाळी लक्ष्मीपुरी मंडई, अकबर मोहल्ला, मुस्लिम बोर्डिंग याठिकाणी दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यानंतरही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या मागणीसाठी आज बुधवारी कोल्हापूर बंदचे आवाहन करत सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येण्याचे जाहीर केले.

याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कारवाई करत आक्षेपार्ह स्टेटस लावलेले अल्पवयीन दोन युवक असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे बंद पुकारू करू नये, असे आवाहन केले. या संपूर्ण प्रकरणावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, “आक्षेपार्ह स्टेटस लावण्याऱ्या संबंधित युवकाच्या कृत्याचा मी निषेध करतो. या प्रकरणी तातडीने कडक कारवाई करण्याची विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये सामाजिक सलोखा आपण सर्वांनी कायम ठेवू. भविष्यकाळात अशा घटना घडू नये यासाठी सर्वांना बोलावून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बैठक घेऊ.” यावेळी त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन सर्वांनी पुढे जाण्याचे देखील आवाहन केले.