पुणे जिल्हा | शेतकरी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा

मंचर, (प्रतिनिधी) – नागापूर (ता.आंबेगाव) येथे शेतकऱ्याच्या आत्महत्येस दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन माकपच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयात देण्यात आले. नागापूर येथे शेतमजुरी करणाऱ्या एका आदिवासी कुटुंबातील एकनाथ बर्डे या व्यक्तीस शेतमालकाने अपमानास्पद वागणूक देवून व मारहाण केल्यामुळे एकनाथ बर्डे यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.

ही घटना अत्यंत निंदनीय व तीव्र संताप आणणारी आहे. या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंबेगाव तालुका समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपी घनश्याम निकम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे,अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करून अटक केलेली आहे.

या पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हे प्रकरण पोलिसांनी धसास लावावे व गुन्हेगारास कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी माकप आंबेगाव तालुका समितीने तहसीलदार आंबेगाव तालुका यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

शासनाने पुढील काळात पिडीत कुटुंबाला आवश्यक ते सहकार्य करावे, अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. माकप तालुका समितीचे बाळू वायाळ, डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे,अविनाश गवारी, देविका भोकटे यांनी हे निवेदन सादर केले आहे.