अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने उचलले कडक पाऊल; ‘थेट पालकांनाच होणार शिक्षा’, वाचा…..

लखनौ – अलिकडे शाळेत शिकणारी मुलेही स्कुटी अथवा तत्सम वाहनाने शाळेत जाताना दिसत असतात. त्यांच्याकडे वाहन चालवण्यासाठी आवश्‍यक असलेला परवानाही नसतो. तरीही ती बेजबाबदारपणे वाहने चालवत असतात. काहीवेळा एकाच वाहनावर तीन तीन जण बसलेले असतात.

त्याहीपुढे म्हणजे धोका पत्करत विविध प्रकारची स्टंटबाजी करत वाहन चालवण्याचेही फॅड निर्माण झाले आहे. अलिकडेच प्रसिध्द झालेल्या अहवालानुसार रस्ते अपघातात मरण पावलेल्यांमध्ये १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे व त्यात मुलींचाही समावेश आहे.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी अर्थात असले अपघात रोखण्यासाठी आता उत्तर प्रदेश सरकारने ठोस पाउले उचलली आहेत. त्यानुसार १८ पेक्षा कमी वय असणारी मुले अथवा मुली यांना उत्तर प्रदेशात वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर एखाद्या घरातील अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी वाहन चालवताना आढळले तर त्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर टाकण्यात आली आहे.

तीन वर्षांची शिक्षा

उत्तर प्रदेशातील अहवालानुसार जर कोणी अल्पवयीन वाहन चालवताना आढळला किंवा आढळली तर त्यांच्या पालकांनाच तीन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांना २५ हजार रूपये दंडही भरावा लागणार आहे. अपघात रोखण्यासाठी उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाकडून हे नियम जारी करण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व आरटीओंना ते निर्देश जारी करण्यात आले असून विद्यार्थ्यांनाही याची माहिती व्हावी याकरता शिक्षण संचालकांनीही जिल्हा विद्यालय पर्यवेक्षकांना पत्र पाठवून याची माहिती कळवली आहे. जर कोणी विद्यार्थी या नियमाचा भंग करत असल्याचे आढळून आले तर त्याच्यासोबतच त्याच्या आई- वडिलांनाही आता शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

पालकांनीच आपल्या लहान मुलांनी गाडी चालवायला देऊ नये आणि याबाबत विशेष खबरदारी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी तसे जर केले नाही तर त्यांना तीन वर्ष शिक्षा आणि दंड तर केला जाईलच, मात्र त्यांचे लायसन्सही रद्द केले जाणार आहे. तसेच जो अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळला त्यालाही २५ वर्षांच्या अगोदर वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही.