पुणे | विद्यार्थ्यांनो, अंमली पदार्थापासून दूरच राहा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नयेत, यासाठी व्यापक प्रमाणावर प्रबोधन घडवणारे समुपदेशनाचे कार्यक्रमही प्राध्यान्याने राबवले जाणार आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित सर्व महाविद्यालये आणि परिसंस्थांध्ये असे समुपदेशन करण्याच्या सूचना विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. संस्थेच्या परिसरात अंमली पदार्थविषयक सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तरुणांना अंमली पदार्थ सेवनासाठी प्रवृत्त करुन व्यसनाधिनता निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत.

स्थानिक पोलीस प्रशासन अशा प्रकारच्या सर्व समाजविघातक कृतींची दखल गंभीरपणे घेत आहेच. सर्व महाविद्यालये, परिसंस्था वा विद्यापीठ विभागांनीही आपल्या स्तरावर दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ विभाग अथवा उपकेंद्र परिसरातील विद्याथ्यांजवळ अंमली पदार्थविषयक कोणतीही बाब निदर्शनास आल्यास अथवा संशायास्पद परिस्थिती आढळल्यास, याबाबतची सर्व माहिती स्थानिक पोलीस प्रशासनास तातडीने कळविणे आवश्यक आहे.

सर्वच विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती होण्यासाठी आणि अंमली पदार्थ व्यसनांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यासाठी आवश्यक असे विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना प्राचार्य, संचालक, केंद्रप्रमुख तसेच विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभागप्रमुख, संचालक यांना देण्यात आलेल्या आहेत.