प्रयोगशाळेत मातेचे दूध बनवण्यात यश; इस्त्राईलमधील संशोधकांची कामगिरी

तेल अबिब : प्रयोगशाळेमध्ये ब्रेस्ट मिल्क म्हणजेच मातेचे दूध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.  इस्रायलमधील काही संशोधकांनी हा दावा केला असून या दुधामध्ये मातेच्या दुधातील सर्व गुणधर्मांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

इस्त्रायल मधील बायो मिल्क नावाच्या एका स्टार्ट अपने ही कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या चीफ सायन्स ऑफिसर आणि सहसंस्थापक डॉक्टर लीला स्टिकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कंपनीने तयार केलेल्या या दुधामध्ये पोषक तत्व इतर कोणत्याही दुधापेक्षा जास्त आहेत. मातेच्या दुधाला इतकेच हे दूध पोषक आणि गुणधर्मांनी भरलेले आहे. या दुधामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि बायो ऍक्टिव्ह लीपिडस ही सर्व तत्त्वे आहेत. जी तत्त्वे फक्त आईच्या दुधामध्ये सापडतात.

डॉक्टर लीला यांनी म्हटल्याप्रमाणे, आईच्या दुधामध्ये काही अँटीबॉडीज असतात, जी बालकाला काही रोगांपासून संरक्षण देतात. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या दुधामध्ये फक्त या अँटीबॉडीज नाहीत. बाकी सर्व गुणधर्म आहेत डॉक्टर लीला त्यांचा मुलगा अपुऱ्या काळात जन्माला आला होता. त्यामुळे त्याला आईचे दूध मिळाले नव्हते. त्यानंतर डॉक्टर लीला यांनी अशा प्रकारचे दूध प्रयोगशाळेत तयार करणे शक्य आहे का?  या दिशेने संशोधन सुरू केले आणि त्यात त्यांना शेवटी यश मिळाले.

आगामी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये हे दूध मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहितीही कंपनीतर्फे देण्यात आली आहे.  प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला या मातेच्या दुधामुळे बालकांची प्रतिकारक्षमता वाढेल आणि त्यांचा मेंदू जास्त चांगल्या प्रकारे विकसित होईल असा दावाही त्यांनी केला आहे.