success story : शहडोलच्या ‘या’ शेतकऱ्याने यूट्यूब पाहून केला नाविन्यपूर्ण प्रयोग ; ४५ अंशात करून दाखवली सफरचंदाची शेती

Success Story : आजच्या जगात कोणतीही गोष्ट हवी असेल किंवा त्याची माहिती पाहिजे असेल तर आपण सर्रासपणे इंटरनेटचा उपयोग करतो. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपली प्रगती इतरांपर्यंत पोहचवतात. याचा फायदा हजारो लोकांना होतो. असाच फायदा एका युवा शेतकऱ्याला झाला असून त्याने या इंटरनेटच्या माध्यमातुन शेतीत एक नवीन प्रयोग करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

शहडोल जिल्ह्यातील करकती गावचे रहिवासी शेतकरी रामसजीवन नवीन तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. यासोबतच रामसजीवन डिजिटल जगाचाही पुरेपूर फायदा घेत आहे. या सर्व गोष्टींचा वापर करून रामजीवन यांनी एक प्रयोग करत जे पीक घेतले आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  कारण सफरचंदाची केवळ थंड प्रदेशात लागवड केली जाते. पण शेतकरी रामसजीवन यांनी हे आव्हान स्वीकारत काश्मीरपेक्षा जास्त तापमान असलेल्या शहडोलमध्येही सफरचंदाची लागवड  करून दाखवली आहे. शहडोलचे शेतकरी रामसजीवन कचेर यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

रामसजीवन कचेर सांगतात की, त्यांनी दीड वर्षांपूर्वी यूट्यूब पाहिल्यानंतर सफरचंदाची शेती सुरू केली. शेतीच्या सुरुवातीला त्यांनी प्रयोग म्हणून सुमारे 45 रोपे मागवून घेतली आणि त्याची लागवड केली.

रामसजीवन कचेर यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानाने सफरचंदाचे फळ असे बनवले आहे की आता ते ४०-४५ अंश सेल्सिअस तापमानातही तयार करता येते. सफरचंदाचे रोपटे इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. या तंत्रज्ञानामुळे झाडे इतके जास्त तापमान सहन करू शकतात. सफरचंद या फळाची रोपे कलम करून तयार केली जातात. याची लागवड साधारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केली जाते.

रामसजीवन यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या शेतात पिकवलेल्या सफरचंदाची फळे बाजारातील सफरचंदांपेक्षा चवदार असतात आणि ही फळे चवीला खूप गोड असतात.  त्यांनी केवळ सेंद्रिय कीटकनाशके आणि सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. त्यामुळे हे फळ खायला खूप चविष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उन्हाळ्यामध्ये झाडाला ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याची गरज भासते. फळ धारणा झाली की साधारणपणे आठवडय़ाने झाडाला पाणी दिले जाते. वेगवेगळ्या हंगामानुसार या फळावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या पिकावर कोलार रॉट, अँपल स्कॅब यासारखे रोग पडतात, या वर मॅनको झेब, कार्बेन्डाझिम तसेच इतर बुरशी नाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेऊ न रोग नियंत्रण करता येते.

लागवडीपासून ४ वर्षांने झाडास फळे येण्यास सुरूवात होते. साधारण बहार आल्यानंतर १३० ते १४० दिवसांपर्यंत फळे काढणीस तयार होतात. एका चांगल्या पद्धतीने जोपासलेल्या झाडापासून साधारण १० ते १२ किलो फळे प्रति वर्षी उपलब्ध होतात.

आजच्या डिजिटल युगात आपल्या देशातील शेतकरी देखील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मागे नाहीत आणि त्याचा पुरेपूर वापर करत आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून नवनवे प्रयोग करत आहेत, नवीन पिकांची लागवड करत आहेत आणि नवीन लोकांशी संपर्क निर्माण करत आहेत. शेतकऱ्यांची तंत्रज्ञानातील आवड आणि मेहनत यांचाही त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. शेतकरी रामसजीवन यांची यशोगाथाही यापैकीच एक आहे. ज्याचे आज सर्वजण कौतुक करत आहेत आणि इतर शेतकऱ्यांनाही हे पाहून प्रेरणा मिळत आहे.