प्रेरणादायी! संसार, मुलं सांभाळून केलेल्या मेहनतीला यश; तीन मैत्रिणी एकाच वेळी बनल्या पोलीस, कौतुकाचा वर्षाव

पुणे – कठोर परीश्रमातून कोणतीही गोष्ट शक्य होते याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आली आहे. येथिल तीन मैत्रिनींनी पोलीस बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. मीनाक्षी कर्चे, आरोही शिळीमकर, दीपाली राणे अशी एकाचवेळी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या तीन मैत्रिणींची नावे आहेत. या तिन्ही मैत्रिणी येथील ‘विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास करत असत. मीनाक्षी यांची पुणे लोहमार्ग, आरोही यांची ठाणे पोलीस, तर दीपाली यांची पिंपरी पोलिसांत निवड झाली आहे.

तिघींचेही लग्न झालेले आहे. दीपाली राणे यांच्या लग्नाला सात वर्ष झाली असून त्यांना एक चार वर्षांचा मुलगा आहे. मीनाक्षी यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत. त्यांची मोठी मुलगी आठवीला तर लहान मुलगी पाचवीत शिकते.

महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या या तिघी मैत्रिणींनी सांगतले की, सरावासाठी त्या पहाटे तीन वाजता उठायच्या. स्वयंपाक करून पाच किलोमीटर सायकलवरून प्रवास करत ग्राउंडला पोहोचायचे. दोन तास ग्राउंडवर सराव करून पुन्हा घरी परतायचे. धुणीभांडी करायच्या. पोरं शाळेत गेली की पुन्हा पाच किलोमिटर प्रवास करून अभ्यासिकेत जात असत. सायंकाळीही ग्राउंडवर सराव करून घरी येत असत. दरम्यान त्यांचा हा संघर्ष नवतरूणींना लाजवणारा आणि प्रेरणादायी ठरत आहे. या तिघी मैत्रिणींना त्यांच्या घरच्या मंडळींनी मोलाची मदत केली. त्यामुळेच त्यांचे स्वप्न सत्यात उतरले असल्याचे त्या सांगतात.

दीपाली राणे या राष्ट्रीय पातळीपर्यंत खो-खो खेळल्या आहेत. त्यांनी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. सासू-सासऱ्यांनीही त्यांना लेकीसारखी मदत केली. दीपाली यांनी पुढे फौजदार होण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे.