पिंपरी | स्पायनल कॉर्ड ट्युमरवर यशस्‍वी शस्त्रक्रिया

पिंपरी, (प्रतिनिधी) – १६ सेंटीमीटर स्पायनल कॉर्ड ट्युमरवर यशस्‍वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचा जीव वाचविण्यात भोसरीतील मेडिकव्हर हॉस्पिटलच्‍या तज्‍ज्ञांना यश आले आहे. डॉ. निनाद पाटील यांचा सल्ला घेऊन एका रुग्णाचा एमआरआय करण्यात आला. त्‍या वेळी ट्युमर असल्‍याचे स्‍पष्ट झाले. या वेळी सी २ ते डी 6 लॅमिनोप्लास्टी सूक्ष्म शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरे करण्यात यश आल्‍याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डाॅ. पाटील यांनी माहिती दिली की, रुग्णाला फेब्रुवारी २०२३ वर्षभरापासून लघवी करताना अडचण व बद्धकोष्टतेची समस्या होती. त्यांनी अनेक युरॉलॉजिस्टचा सल्ला घेतला व युरॉलॉजी संदर्भात अनेक वैद्यकीय उपचार केले.

परंतु बरे न वाटल्‍याने संबंधीत रुग्णाच्‍या हात आणि पायात वेदना होत असत. चालताना देखील त्रास होऊ लागला होता. तेव्हा त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल भोसरी येथे उपचारासाठी दाखल केले. एमआरआय मध्ये रुग्णाच्‍या स्पायनल कॉर्ड मध्ये १६ सेंटीमीटर इतका प्रचंड ट्युमर आढळून आला.

तज्‍ज्ञ डाॅक्‍टरांनी अचूक आणि काळजी घेऊन गुंतागुंतीची यशस्‍वी शस्त्रक्रिया केली. संपूर्ण ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकल्यानंतर परिश्रमपूर्वक फिजिओथेरपीच्या मदतीने रुग्णाला बरे केले आहे. शस्त्रक्रियेच्‍या एका महिन्याच्या आत रुग्णाची गतिशीलता वाढल्‍याचे डाॅ. पाटील यांनी सांगितले.