तहसीलदार कंत्राटीबाबत सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे – भाजपाला या महाराष्ट्राचे नेमके काय करायचंय? आता तहसीलदार देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा निर्णय घेताना रात्रंदिवस एक करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्या उमेदवारांचा तरी विचार करायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार पदासाठी कंत्राटी भरती करण्याबाबत जाहिरात दिली आहे, त्यावरून खासदार सुळे यांनी सरकारला धारेवर धरले असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यात लाखो उमेदवार दरवर्षी तहसीलदार आणि तत्सम पदांवर निवड व्हावी, क्‍लास वन अधिकारी होऊन आईवडिलांची स्वप्ने साकार करावी, यासाठी एमपीएससीची परीक्षा देतात. आता त्यांची संधी कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गिळंकृत केली जात आहे.

संपूर्ण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे हे असले आदेश काढण्याआधी किमान या उमेदवारांचा विचार शासनाने करायला हवा होता. काही चांगले करता येत नसेल तर किमान कुणाचे वाईट तरी करू नये हे तत्त्व या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही का? असा सवाल खासदार सुळे यांनी सरकारला विचारला आहे.