nagar | निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन बंद

अकोले, (प्रतिनिधी) – निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रातील पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले. या आवर्तनात ३.५ द.ल.घ.फु.पाण्याचा वापर झाला. उजव्या कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणीसाठा कमी झाला असून, निळवंडे धरणाने तळ गाठला आहे.

निळवंडे धरणातून उन्हाळी हंगामातील शेवटचे सुरू असलेले आवर्तन गुरुवार दि. २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात आले आहे. प्रवरा नदीपात्रात गेली २० ते २५ दिवसांपासून हे सिंचनाचे आवर्तन सुरू होते. या आवर्तनात ३.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. काल प्रवरा नदीपात्रात सुगाव शिवारात मनोहरपूर फाटाजवळ दोन तरुण पाण्यात बुडून मयत झाले होते.

त्यातील एकाचा मृतदेह काढण्यासाठी एसडीआरएफचे पथक सकाळी रेस्क्यु मोहीम राबवत असताना ३ जवान व १ स्थानिक शेतकरी यांचा बोट उलटून पाण्यात बुडून मृत्यू झाला. जवानाचे मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र कालचा एक व आजचा एक स्थानिक तरुण यांचे मृतदेह सापडत नसल्याने पाण्याचा प्रवाह बंद केला तर नदीपात्रातील पाणी बंद होऊन मृतदेह काढण्यासाठी सोपे होईल,

यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पाणी बंद करण्याची मागणी केली होती.पालकमंत्री यांनी आदेश दिल्याने सायंकाळी ५ वाजता निळवंडे धरणातून सुरू असलेले हे आवर्तन बंद करण्यात आले आहे.

उजव्या कालव्याचे आवर्तन मात्र सुरू आहे. उन्हाळ हंगामातील या सिंचनाचे आवर्तनात ३.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला. सद्या भंडारदरा धरणात १२४० द.ल.घ.फु.तर निळवंडे धरणात ९५१ द.ल.घ.फु.पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.