सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार; दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या या पत्रानंतर राज्यात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परंतु, सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के.कौल आणि आर.सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात का गेले नाही, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले कि, तुम्ही काही आरोप करत आहेत तर मंत्रीही काही आरोप करत आहे. याप्रकरणी उच्च न्यायालय सुनावणी का करू शकत नाही. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु, याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते. तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या उच्च न्यायालयासमोर मांडाव्या, असे याचिकाकर्त्यांना सांगितले आहे.

यावर मुकुल रोहतगी यांनी म्हंटले कि, आम्ही आजच उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. उच्च न्यायालयाने सुनावणी करावी, असे आदेश तुम्ही द्यावे, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी याचिकेत केलेला आहे. सिंग यांनी याचिकेत तीन मागण्या केल्या होत्या. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंग यांनी याचिकेत केल्या होत्या.

Leave a Comment