वडगावातील सहा हजार कुटुंबांचे सर्वेक्षण

वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत वतीने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत बुधवारी (दि. 23) सहा हजार कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये सुमारे 25 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

करोना सदृश्‍य लक्षणे आढळून आलेल्या चाळीस नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. यापैकी आठ नागरिकांचे अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने त्यांना तळेगाव दाभाडे येथील कोव्हिड केअर सेंटर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले, अशी माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

या मोहिमेसाठी समारे 145 आरोग्य सेवकांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग, स्वयंसेवक, नगरपंचायत कर्मचारी आदी सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेत शहरातील डॉ. दिनेश दाते, डॉ. गौरव धंदुके, डॉ.ज्योती बुतडा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

शहरात दिवसभर सर्वेक्षण सुरू असताना तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, तालुका समन्वयक अधिकारी गुणेश बागडे आदींनी भेट दिली. आज शहरात दिवसभर लॉकडाऊन असल्याने नागरिकांनीही आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment