राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवारांबाबत सस्पेन्स ! जयंत चौधरी यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रह

नवी दिल्ली – राष्ट्रीय लोक दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आघाडी भलेही झाली असली तरी बागपत हा राष्ट्रीय लोकदलाचा बालेकिल्ला कोण लढवणार याबाबत अद्याप सस्पेस कायम आहे. पक्षाचे नेते जयंत चौधरी किंवा त्यांच्या पत्नी चारू चौधरी किंवा पक्षाचा अन्य कोणी कार्यकर्ता यांच्यापैकी नक्की कोण लढवणार याबाबत चर्चा सुरू आहेत.

जयंत चौधरी यांनी स्वत:च रिंगणात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यातून दोन बाबी साध्य होतील. एक म्हणजे दोनदा पराभूत झालेले जयंत चौधरी पुन्हा लोकसभेत जाउ शकतील आणि दुसरे म्हणजे त्यांच्या विजयामुळे संपूर्ण पश्‍चिम उत्तर प्रदेशात पक्षाबाबत एक सकारात्मक संदेश जाईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जयंत यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि लोकसभेच्याच रिंगणात उतरावे अशी आग्रहाची मागणी केली जाते आहे. बागपत ही चौधरी कुटुंबाची परंपरागत जागा आहे.

येथील त्यांच्या विजयामुळे एक चांगलाच संदेश उत्तर प्रदेशात जाईल अशी भावना आहे. भाजपमध्येही एक मोठा गट असे मानतो की दोन्ही पक्षांमध्ये जी आघाडी झाली आहे त्याचे उद्दिष्ट तेंव्हाच पूर्ण होईल जेंव्हा जयंत स्वत: निवडणूक लढवतील. मात्र जयंत यांनी अद्याप मौन बाळगले असल्यामुळे ते काय करतात याबाबत सस्पेन्स आहे.

आपली पत्नी चारू चौधरी निवडणूक लढवणार नाही असे स्वत: जयंत यांनी मागेच स्पष्ट केले होते. मात्र आता चारू यांच्याच नावाची जास्त चर्चा आहे. त्याचे कारण म्हणजे जयंत यांनी अगोदरचे वक्तव्य केले होते तेंव्हा त्यांची भाजपशी युती झालेली नव्हती. मात्र आता ते भाजपच्या आघाडीत दाखल झाले असल्यामुळे चारू यांना विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागणार नाही असे मानले जाते आहे.