Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

Swachh Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छता अभियानांतर्गत श्रमदान केले आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  व्हिडिओमध्ये हरियाणाचा अंकित बैयनपुरिया  दिसून येत आहे.  अंकित बैयनपुरिया  ज्याने ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण केले आहे, सध्या सोशल मीडियावर पंतप्रधानांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधानांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये  पीएम मोदींनी, ‘आज जेव्हा देश स्वच्छतेकडे लक्ष देत आहे, त्यावेळी मी आणि अंकित बैयनपुरियानेही तेच केले. स्वच्छतेसोबतच आम्ही फिटनेस आणि तंदुरुस्तीचाही त्यात समावेश केला आहे. हे सर्व स्वच्छ आणि निरोगी भारताच्या भावनेबद्दल आहे!’ असे म्हटले आहे.पंतप्रधानांचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

दरम्यान,  2014 मध्ये नरेंद्र  मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले. या मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या आजूबाजूची ठिकाणे स्वच्छ ठेवण्यास आवाहन करण्यात येते. लोकांनी केवळ आपला परिसर स्वच्छ ठेवू नये तर पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले आहे. दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.