Sweden On Islam: दहशतवादी हल्ल्याबाबत स्वीडन हाय अलर्टवर; म्हणाले,”आम्हाला इस्लामचे शत्रू म्हणून जगासमोर सादर केले”

Sweden On Islam : मागच्या वर्षी मुस्लिम धर्मियांचे पवित्र कुराण जाळण्यावरून युरोपीय देश स्वीडनमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे जगातील अनेक मुस्लिम देशांनी स्वीडनला विरोध दर्शवला होता. दरम्यान, देशात दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याची माहिती स्वीडिश सुरक्षा पोलिसांनी  दिली आहे. त्यातच स्वीडन आता हाय अलर्टवर गेल्याची माहिती समोर येत आहे.

स्वीडिश सुरक्षा सेवेने एक निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की,”नॉर्डिक देशाविरूद्ध दहशतवादी धोक्याचे चार भिन्न स्तर आहेत. यावेळी ही पातळी 5-अंशांच्या प्रमाणात नोंदवण्यात आली आहे. नॉर्डिक देश स्वीडनमध्ये गेल्या वर्षीपासून दहशतवादी धोक्याची पातळी वाढली आहे, त्यामागील मुख्य कारण इस्लामिक धार्मिक ग्रंथ कुराणचा अपमान असल्याचे सांगितले जात आहे.

स्वीडनची प्रतिमा डागाळली
स्वीडिश सिक्युरिटी सर्व्हिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्वीडनची ओळख इस्लामचा शत्रुत्व असलेला देश म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. त्यांनी देशात  इस्लामवादाच्या वाढत्या दहशतवादाला खतपाणी घातले आहे. आमच्या सरकारने याबाबत वार्षिक मूल्यांकन केले, त्यानंतर देशाच्या सुरक्षेबाबत अजूनही सतर्क राहावे लागत असल्याचे समोर आले. हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.असे सांगण्यात आले आहे.

पुढे त्यांनी, “जगातील अनेक दहशतवादी संघटनांनी स्वीडनवर दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्याही दिल्या आहेत. याशिवाय देशात उपस्थित असलेल्या काही गटांनीही हल्ल्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.

ब्रुसेल्समध्ये स्वीडिश लोकांची हत्या
मुस्लिम जगतातील अनेक प्रमुखांनी स्वीडनमध्ये ऑगस्ट २०२३ मध्ये कुराणच्या अपमानाचा निषेध केला. यानंतर जिहादींकडून देशाला सतत धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे गेल्या ऑक्टोबरमध्ये ब्रुसेल्समध्ये स्वीडिश फुटबॉल शर्ट घातलेल्या दोन स्वीडिश नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ल्यामागील संभाव्य हेतू त्याचे राष्ट्रीयत्व होते.