भारतीय आंब्यांचा परदेशांतही गोडवा

पुणे – फळांचा राजा आंबा आणि भारतीय आहार यांचे “गोड’ नाते आहे. हाच गोडवा आता परदेशी नागरिकांच्या पसंतीस पडला आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी प्रमाणात आंबा निर्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल वाणिज्य मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, आंबा आयातीत अमेरिकेचा क्रमांक अव्वल आहे.

सन 2023-24 च्या पहिल्या पाच महिन्यांत भारतातून आंब्याच्या निर्यातीत 19 टक्‍के वाढ नोंदवण्यात आली. यात प्रामुख्याने अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इराण आणि झेक प्रजासत्ताक यांसारख्या नवीन बाजारपेठा या फळांच्या राजाला मिळाल्या आहेत. या वर्षी 41 देशांमध्ये विविध फळे भारतातून पाठवण्यात आली आहेत.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2022 दरम्यान भारताने 40 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचा सुमारे 23,000 मेट्रिक टन आंब्यांची निर्यात केली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 टक्‍के अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी मंत्रालय आणि कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांनी वाशी, नाशिक, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे परिपूर्ण तपासण्या केल्या.

त्यांचा अहवाल परदेशांतही पाठवला. त्यानंतरच ही निर्यात करण्यात आली. केवळ अमेरिकाच नाही, तर भारताने दक्षिण कोरियातून आंब्याच्या निर्यातीसाठी पूर्वमंजुरी घेतली होती. त्यामुळे 18.43 टन फळांची निर्यात करण्यात भारताला यश आले. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत असून, शासनाला महसूल मिळत आहे.

देश आणि आंब्याची निर्यात
न्यूझीलंडला 111 टन, ऑस्ट्रेलियाला 58.42 टन, जपानला 43 टन आणि दक्षिण आफ्रिकेत 4.44 टन आंब्यांची निर्यात झाली. याशिवाय इराण, नायजेरिया, झेक प्रजासत्ताक, मॉरिशस या देशांत भारतीय आंब्यांची निर्यात करण्यात आली आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.