T-20 World Cup : पंड्याच्या जागी शार्दुलच्या निवडीचे संकेत

मुंबई –आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत. यासाठी आयसीसीने 15 ऑक्‍टोबर हा अंतिम दिवस निश्‍चित केला असून याच दिवसापर्यंत स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना आपल्या संघात फेरबदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. 

भारतीय संघाबाबत बोलायचे तर अष्टपैलु हार्दिक पंड्या याने आयपीएल तसेच त्यापूर्वी झालेल्या मालिकांत सुमार कामगिरी केल्यामुळे त्याचे स्थान धोक्‍यात आले असून त्याच्या जागी भरात असलेल्या शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळाले आहेत.

या स्पर्धेला येत्या 17 ऑक्‍टोबरपासून पात्रता सामन्यांनी प्रारंभ होत आहे. मुख्य फेरी 19 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार असून अंतिम लढत 15 नोव्हेंबरला होणार आहे.
पंड्याच्या तंदुरुस्तीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्याच्या पाठीची दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नसल्याने या स्पर्धेतही तो गोलंदाजी करण्याची शक्‍यता धूसर बनली आहे.

त्यातच त्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा दीपक चहर यांच्यापैकी एका खेळाडूला संधी देण्याबाबत दडपण वाढत आहे. सर्व सहभागी देशांना आपापल्या संघात बदल करण्यासाठी येत्या 15 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पंड्याचे संघातील स्थान धोक्‍यात आले आहे.