#T20WorldCup : भारत-दक्षिण आफ्रिका आज एकमेकांशी भिडणार

पर्थ :–  टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकत भारताने गट-2 मध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. या स्पर्धेतील भारताचा पुढील लढत आज (रविवार,दि.29 दुपारी 4.30 वा., पर्थ) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

सध्या भारतीय संघातील चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. या स्पर्धेतील सुपर 12च्या पहिल्या सामन्यात विराट कोहली, तर दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी उत्तम फलंदाजी केली. आता टी-20 विश्‍वातील अव्वल दर्जाच्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे.

पर्थवरील खेळपट्‌टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्याने फलंदाजी करणे कठीण होउ शकते. या पार्श्‍वभूमीवर कागिसो रबाडा आणि एनरिक नोर्टजे यांच्या भेदक ट्रॅकला भारतीय फलंदाजांना सामोरे जावे लागणार आहे. रोहित आणि विराट हे सर्वोत्कृष्ट फलंदाज असून पॉवर-प्लेमध्ये ते किती चांगली कामगिरी करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. खेळपट्‌टीवरील अतिरिक्‍त वेगामुळे भारतीय फलंदाजांचा दृष्टीकोन काय असेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड म्हणाले, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकासाठी काही दिवस अगोदरच पोहोचला. त्यावेळी भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सराव सामने खेळले. हे सामने पर्थ येथे खेळले गेले. त्यातच आफ्रिकेविरुद्धचा सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना महत्वाचा असेल याची आम्हाला जाण होती. यामुळे पर्थमध्ये एक आठवडा सराव केल्याचा फायदा मिळेल. संघात पाहिले तर वेगवान गोलंदाजीविषयी सध्यातरही काहीच अडचण नाही, असेही राठोड यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका क्विंटन डी कॉक, रिले रोसो आणि डेव्हिड मिलर या तीन डावखुऱ्या खेळाडूंसह मैदानात उरतेल. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल फळीतील एकमेव समस्या म्हणजे कर्णधार टेम्बा बावुमा, जो अद्याप पूर्णपणे बहरात आलेला दिसत नाही. तथापि, रोसोने बॅक-टू-बॅक शतक ठोकल्याने भारतीय गोलंदाजांसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास भारतीय गोलंदाजी आक्रमणापेक्षा आफ्रिकेकडे वरचढ गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. दरम्यान, भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पुढील दोन सामन्यांमध्ये बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा पराभव केल्यास ऍडलेड हे भारताचे उपांत्य फेरीचे ठिकाण असेल.

ऋषभ पंतला संधी?

भारतीय संघातील सलामीचा फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. यंदाच्या विश्वचषकातील दोन्ही सामन्यात तो काही खास कमाल दाखवू शकला नाही. अशा परिस्थिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

संभाव्य संघ

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नोर्टजे, लुंगी एनगिडी, हेन्रिक क्‍लासेन, तबरेझ शम्सी, रिझा हेंड्रिक्‍स, रीझा हेंड्रिक्‍स.