T20 World Cup 2024 : ‘किलर’ मिलरने द. आफ्रिकेला उलटफेर होण्यापासून वाचवले, थरारक सामन्यात नेदरलँड पराभूत…

T20 World Cup 2024 (NED vs SA, Match No 16) – डेव्हिड मिलरचा विजयी षटकाराच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सवर शानदार विजय मिळवला. मिलरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सवर ७ चेंडू आणि ४ गडी राखून सहज विजय मिळवला आहे. मिलरने ५१ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या जोरावर ५९ धावा केल्या. संघाने झटपट ४ बळी गमावल्यानंतर फलंदाजीला आलेला मिलर संघाला एकहाती विजय मिळवून देत नाबाद परतला.

मिलरने नेदरलँड्सच्या भेदक गोलंदाजीला न जुमानता अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके लगावले. विजयी षटकारानंतर सिंहाप्रमाणे गर्जना करत मिलरने विजयाचा आनंद साजरा केला, यासह मिलरला सामनावीरही घोषित करण्यात आले.

डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सच्या उपयुक्त भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिका संघाला नेदरलँड्सवर विजय मिळवण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरूद्ध विजय मिळवला खरा पण हा विजय संघासाठी अजिबातच सोपा नव्हता. नेदरलँड्सने या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला बरोबरीची टक्कर दिली. पहिल्या तीन षटकांत तीन बळी गमावत दक्षिण आफ्रिकेची सुरूवात खूपच खराब झाली. पण मिलर आणि स्टब्सने संघाचा डाव सावरत तिसऱ्यांदा मोठा उलटफेर होण्यापासून संघाला वाचवले.

मिलरने ट्रिस्टन स्टब्ससोबत पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या षटकात १२ धावांत चार बळी गमावले होते, त्यामुळे गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात त्यांना पराभूत करणारा नेदरलँड्सचा संघ पुन्हा एकदा अपसेट खेचून आणेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यानंतर मिलर आणि स्टब्सने सावध खेळ करत संघाला संकटातून बाहेर काढले.

नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला आणि नेदरलँड्सला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही. नेदरलँड्सला २० षटकांत ९ बाद केवळ १०३ धावांलर रोखला गेला. नासाऊच्या उसळत्या खेळपट्टीवर नेदरलँड्स संघानेही ४८ धावांत ६ बळी गमावले. दरम्यान सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांनी ४४ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करत संघाला १०० चा आकडा गाठण्यात मदत केली.

T20 World Cup 2024 : भारत-पाक रणसंग्राम आज..! हायहोल्टेज सामन्याकडे जगाच्या नजरा; जाणून घ्या, सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

दक्षिण आफ्रिकेकडू ओटनेल बार्टमनने सर्वाधिक ४ बळी घेतले. मार्को जॅन्सन आणि एनरिक नॉर्कियाने प्रत्येकी २ गडी बाद केले.या सामन्यातील नेदरलँड्सच्या पराभवापूर्वी दोन वेळा या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचे पाणी पाजले होते. हे दोन सामने नेमके कोणते होते आणि त्यातील डच संघाची कामगिरीही शानदार राहिली होती. टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यातही नेदरलँड्सने आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळवले होतं, पण मिलरमुळे सामना जिंकला.