#T20WorldCup : अफगाणिस्तानवर बंदीची शक्‍यता

दुबई -आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या सहभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जे देश टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळतात त्यांना आयसीसीकडे आपला अधिकृत ध्वज देणे बंधनकारक असते. 

आता अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे जर त्यांनी तालिबानचा ध्वज सादर केला, तर त्याला आयसीसी विरोध करेल. येत्या 17 ऑक्‍टोबरपासून ओमान आणि अमिरातीत ही स्पर्धा होणार आहे. 

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना त्यांचे राष्ट्रीय ध्वज आयसीसीला द्यावे लागणार आहेत. यामध्ये जर तालिबानचा ध्वज देण्यात आला, तर अफगाणिस्तान संघाला टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्यावर बंदी लावली जाईल. ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली व लगेचच अफगाणिस्तानच्या महिला संघाला खेळण्यावर बंदी घातली, त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने नोव्हेंबर महिन्यात होणारी कसोटी खेळण्यास नकार दिला. 

महिला संघावर बंदी घातल्यामुळे अफगाणिस्तानचा कसोटी दर्जाही काढण्याचा इशारा आयसीसीने दिला आहे. आयसीसीच्या नियमानुसार कसोटी दर्जा मिळवण्यासाठी देशाचा महिला आणि पुरुष संघ असणे गरजेचे आहे.