#T20WorldCup #ENGvNZ : इंग्लंडचा विजय; न्यूझीलंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ

ब्रिस्बेन – फलंदाजी व गोलंदाजीत सरस कामगिरी करत इंग्लंडने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा (#ENGvNZ) 20 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या पराभवामुळे यजमान ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा उभारल्या. त्यांच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर कर्णधार बटलरने अलेक्‍स हेलच्या साथीत संघाला 81 धावांची सलामी दिली. हेल्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, 52 धावांची खेळी करताना 40 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली. तो बाद झाल्यावर मोईन अली, हॅरी ब्रुक व अष्टपैलु बेन स्टोक्‍सने साफ निराशा केली.

दरम्यान बटलरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनच्या साथीत संघाचे दीडशतक फलकावर लावले. लिव्हिंगस्टोन 20 धावांवर परतला. त्यानंतर बटलरही धावबाद झाला. त्याने आपल्या 71 धावांच्या आक्रमक खेळीत 47 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी केली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 गडी बाद कले.

विजयासाठी 180 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 20 षटकांत 6 बाद 159 धावांवर रोखला गेला. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर डेव्हन कॉनवे लवकर परतला. त्यानंतर फिन ऍलेनही 16 धावांवर बाद झाला. यावेळी कर्णधार केन विल्यमसन व ग्लेन फिलिप्स या जोडीने डाव सावरताना संघाला शतकी मजल मारुन दिली. विल्यमसन स्थिरावलेला असतानाच 40 धावांवर बाद झाला.

जेम्स निशाम व डॅरेल मिशेल यांनी साफ निराशा केली. फिलिप्सने एक बाजू सावरुन धरलेली असताना त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. तो देखिल वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 62 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 36 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावले. तळात मिचेल सॅन्टनरने नाबाद 16 तर, इश सोधीने नाबाद 6 धावा करत शर्थीचे प्रयत्न केले मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना संधीच दिली नाही व सामना जिंकला. इंग्लंडकडून सॅम कुरेन व ख्रिस वोक्‍स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ

इंग्लंडने अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा पराभव करत आपले दुसरे स्थान पुन्हा पटकावले तर ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झालीय. ग्रुप 1 मधील सर्व संघांचे प्रत्येकी 4 सामने झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे समान म्हणजे प्रत्येकी 5 गुणांवर आहेत. मात्र धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड अव्वल स्थानावर, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या तिघांमध्येच सध्या तरी सेमी फायनल (semi-final) पार करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. तीनही संघांनी आपले पुढचे सामने जिंकले तर सरस धावगतीमुळे न्यूझीलंड आणि इंग्लंडला फारसा धोका नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप बाहेर जाण्याचा धोका निर्माण झालाय.

 

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड – 20 षटकांत 6 बाद 179 धावा. (लियाम लिव्हिंगस्टोन 20, अलेक्‍स हेल्स 52, जोस बटलर 73, लॉकी फर्ग्युसन 2-45).

न्यूझीलंड – 20 षटकांत 6 बाद 159 धावा. (ग्लेन फिलिप्स 62, केन विल्यमसन 40, सॅम कुरेन 2-26, ख्रिस वोक्‍स 2-33).